Breaking newsHead linesMaharashtraPolitics

पराभवाच्या भीतीनेच अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार!

– अखेर अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची सपशेल माघार
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
– कालच शरद पवार, राज ठाकरे यांनी माघार घेण्याचा भाजपला दिला होता सल्ला

मुंबई (प्राची कुलकर्णी) – रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर भारतीय जनता पक्षाने माघार घेतली आहे. या मतदारसंघात स्व. लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्याविषयी असलेली सहानुभूतीची लाट, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष आणि वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर असे भरभक्कम पाठबळ लाभल्याने या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव निश्चित होता. तर शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा विक्रमी मतांनी विजय निश्चित होता. या विजयाचे श्रेय उद्धव ठाकरे यांना मिळू नये, यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या खांद्यावर देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्याचे फार्स रचून भाजपने अतिशय सुरक्षित माघार घेतली आहे. त्यामुळे राजकीय अटीतटीच्या लढतीत देवेंद्र फडणवीस यांच्यावरील पराभवाची नामुष्की टळली असली तरी, मध्यंतरीच्या काळात ऋतुजा लटके यांच्यासमोर निर्माण केलेली अडथळ्यांची शर्यत अंधेरीतील मतदार विसरलेला नाही, असा प्रतिक्रिया आता मतदारांतून उमटत आहेत. भाजपची माघार ही पराभवाची नामुष्की टाळण्यासाठीच आहे, अशी जोरदार टीका सोशल मीडियावर राज्यभरातून सुरु आहे.

भाजपच्या माघारीमुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कालच आश्चर्यकारकरित्या पत्र लिहिले होते. यानंतर भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले. अखेर भाजपने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतल्याची घोषणा दुपारी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठकारे यांनी आभार मानणारे पत्र लिहित आभार मानले होते, पत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहले आहे की, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकार्‍यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. पुढे त्यांनी म्हटले की, चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार अशा शब्दात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

तर, या सर्व घडामोडींवर ऋतुजा लटके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्यात, ‘निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता बिनविरोध झाल्याने सगळ्यांचे आभार मानते. गेले काही दिवस माझ्यासोबत प्रचारासाठी धावपळ करत होते, त्या सगळ्यांचे आभार. माझे पती रमेश लटके यांचे सर्वपक्षीयांशी सौहार्दपूर्ण संबंध होते. अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय असेल’, असे ऋतुजा लटके यांनी सांगितले. तर, ‘हे भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. ‘या निवडणुकीसंदर्भात जो निर्णय होईल त्याचा परिणाम मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर होणार होता. या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रकार घडला तो सामान्य माणसाला आवडलेला नाही. विजय मिळणार याची खात्री असती तर माघार घेतली नसती’, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

‘महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. दिवंगत व्यक्ती जाते, घरातले कुणी उभे राहते तेव्हा आम्ही उमेदवारी देत नाही. भाजपने आडमुठेपणा केला. लटके मॅडमचा राजीनामा अडकवण्यात आला. त्यावेळी ज्या पद्धतीने त्रास देण्यात आला ते आम्ही पाहिले. भाजपने मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला आहे. मुरजी पटेल यांनी महानगरपालिकेत खोटे जात प्रमाणपत्र दिल्याने वाद निर्माण झाला होता. उशिरा सुचलेले शहाणपण आहे. हे सगळे आधी करता आले असते. घमासान झाले नसते. लटके मॅडमना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जो मानसिक त्रास झाला त्याचे काय करणार’? असे शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.


भाजपनं सहानभुतीपूर्वक निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. मात्र अनेकांना भाजपचं स्पष्टीकरण पटलेलं नाही. निवडणूक लढवायचीच नव्हती, सहानुभूती होती, मग पटेल यांची उमेदवारी का जाहीर केली, त्यांनी वाजतगाजत उमेदवारी अर्ज का भरला, १०-१० आमदारांना प्रचारासाठी का उतरवलं, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!