BULDHANAVidharbha

संजूभाऊ अन् वारकरी : वाद ते आशीर्वाद!

राजेंद्र काळे/ वृत्तदर्पण

बुलढाणा – नवरात्रीत तारापूरला अंबादेवीच्या दर्शनाला जाण्याचा योग आला तो, आ. संजूभाऊ व पुजाताई या दांम्पत्यासोबत.. त्याच ‘फॉच्र्युनर’मधून की जिच्यावरचं याच ‘वृत्तदर्पण’ मधलं एक वार्तापत्र तुफान गाजलं होतं. गाडी खरंच भारी, त्यापेक्षा ‘भारी’ गाडीतला ‘आमदार’ म्हणण्यापेक्षा ‘कामदार’ माणूस. सोबत मी असल्याने ते मागच्या सीटवर, पुजाताई पुढे बसलेल्या. रस्त्यानं जाणारी लोकं भाऊची गाडी बघून नमस्कार करायचे, पुजाताई हात जोडून स्विकार करायच्या.. ‘लोकं तुला नाही, गाडी पाहून नमस्कार करतात..’ असं संजूभाऊ गंमतीनं म्हणायचे, तरी त्यांना किती वास्तव भान आहे व गाडीत असूनही ते किती जमीनीवर आहे, याची जाणीव झाली. रस्त्यानं गाव आलं की, त्या गावच्या समस्या तोंडपाठ.. गावासाठी काय करायचं? याचं नियोजन तयार. कोणता रस्ता कुठून कुठं वळवायचा, याचा आराखडा कागदावर उतरायच्या आधीच प्लॅन तयार, पलढगचा कालवा, पिण्याच्या पाण्याच्या योजना.. एवढचं काय त्या-त्या गावासाठी सुसज्ज स्मशनभूमीही.. प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबींचा अन् घटकांचा सखोल अभ्यास, त्यासाठी कुठून अन् कसा निधी आणायचा? सर्व ‘प्लॅनिंग’ तोंडपाठच. गाडीत गप्पांचा विषय फक्त, विकास. अमूक काय करतो, टमूकचं काय चाललयं अन् फलान्याची कशी लेवल लावायची.. या गप्पा साधारणत: पत्रकार गाडीत असला की नेत्यांच्या ऐकण्याची सवय. पण रात्री कोण कुठं बसतो? याचं काहीही सोयरसुतक न ठेवता, रात्रंदिवस मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं? हाच विचार व त्यासाठी प्रत्यक्ष आचार म्हणजे संजूभाऊ!

१०० कोटी/२०० कोटीच्या गप्पा ऐकून अनेक वर्ष ३२ कोटीच्या वर आकडा न ऐकल्यामुळं, बुलढाणा मतदार संघ वासियांना संजूभाऊ फफाऱ्या हाणतात की काय? असंच वाटायचं. त्यांची ती २२ पुतळ्यांची संकल्पना ऐकून खिल्ली उडवली जायची. शिवस्मारक, शिवाजी महाराजांचे मंदीर, नाना-नानी पार्वâ, वारकरी भवन, पत्रकार भवन, तलाव सौंदर्यीकरण, पाईपलाईन खरंच यासाठी एवढे कोटी भेटतील का? चौकात या गप्पा होवून टिंगल टवाळी करुन त्यांचं हसं उडवलं जायचं. पण आता जेव्हा कामं उभं होतांना दिसू लागलीत तेव्हा ‘इस आदमी मे कुछ दम है..’ असे उद्गार नकळत येवून बोलून करुन दाखवणारा आमदार कसा असावा? तर संजय गायकवाड सारखा, असं दुसरं-तिसरं कोणी सोडा कल्पक व्यक्तीमत्व असणारे बुलडाणा अर्बनचे ‘भाईजी’ जाहीरपणे म्हणायला लागले. ‘इतका निधी संजूभाऊ मंत्रालयातून धमक्या देवून तर आणत नाही ना?’ असं ते पत्रकारांच्याच कार्यक्रमात बोलले. प्रकाशभाऊ पोहरे कोण्या आमदाराची स्तुती साधारणत: करत नाही, पण ‘आमदार असावा तर संजूभाऊसारखा..’ असं तेही जाहीरपणे बोलले.

अर्थात संजूभाऊंची वादग्रस्त वक्तव्य राज्यभर गाजत असलीतरी, ते कितीही कठोर वाटत असलेतरी.. अगदी ‘छावा’ संघटनेतल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जावून त्या कुटुंबाची दिवाळी करुन दिवाळीसाठी त्या कुटुंबाला काहीतरी देणे.. हा कमालीचा हळवेपणाही त्यांच्याठायी आहे. प्रसंगी ते किती मेणाहूनी मऊ आहे, हे त्यांच्या जवळच्यांनाच कळते ‘छिनालच्या, टन्ना, कोणाखाली घातली..’ हे तसे जुन्या गावचे परवीलचे शब्द म्हणण्यापेक्षा शिव्या त्यांच्याही तोंडी येतात, त्यातून वाद उद्भवतात. ‘पण जिथं शेजारच्या मोहल्ल्याची सकाळ शिव्यानं, दुपारी भांडण तर मारामाऱ्यानं रात्र होते..’ अशा वस्तीत लहानचे मोठे होत असतांना, याची दुसरी बाजू अशी की.. जगण्याविषयीच्या मुलभूत प्रश्नांची जाण व तळागाळातल्या समस्या त्यांना अंगभूत अवगत असल्याने विकासाचा दृष्टिकोन खालपासून वरपर्यंत आहे. यामुळे प्रत्यक्षात काम करतांना संजुभाऊ हे राहत नाहीत केवळ, आमदार.. तर ठरतात, कामदार!

संजुभाऊ अन् वाद, हे समीकरण जणु त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं. त्यामुळं त्यांच्या बोलण्यातून गैरसमज होणं, हे अगदी सहज. कोणाला चांगलं वाटण्यासाठी गोड अन् ग्वॉड बोलणं, हे जे नेत्यांना जमतं ते त्यांच्या ‘कार्यकर्ता’ असणाऱ्या स्वभावाला कधी जमलचं नाही. त्यामुळं त्यांना ‘आमदार’ व्हायलाही खूप उशीर लागला, पर्यायाने बुलढाणा मतदार संघाच्या विकासालाही उशीर झाला. असो तर ‘देर आये दुरुस्त आये..’ पण ते बोलून जातात, अन् वाद भडकतात. अगदी त्यांचं ‘चुन चुन के..’ शिवतिर्थावरील दसरा मेळाव्यापर्यंत जावून पोहचलं. असंच एक महाराष्ट्रभर वाद करुन गेला होता, त्यांचा खाण्याचा सल्ला. कोरोना काळात त्यांनी अंडी अन् मांसाहाराचा सल्ला दिला, अन् अनेक वारकरी भडकले. हिंदुत्ववादी शिवसेनेचा आमदार हिंदू धर्म बुडवायला निघाला, इथपर्यंत फोनाफानी झाल्या. ‘टन्ना-बिन्ना’च्या ऑडीयो क्लिप व्हायरल झाल्यात. जणूकाही ‘वारकरी सांप्रदाय विरुध्द संजय गायकवाड’ असे वातावरण तयार झाले होते. काहीजण तर मुद्दामहून फोन करुन, संजूभाऊंचे रक्त उसळवायला लावून द्यायचे. अगदी ‘मातोश्री’पर्यंत तक्रारी गेल्या, पण नाही म्हणायला यात काही सुजाण वारकऱ्यांनी संजूभाऊंची साथ दिली. पण हा वाद धगधगत ठेवण्यात गायकवाडविरोधी गट सक्रीय होता.. पण बोलणं मनात ठेवून काम करणारे नव्हे तर, बोलणं विसरुन काम करण्याचा स्वभाव संजूभाऊंचा. त्यामुळं या वादाआधी एका कार्यक्रमात वारकऱ्यांच्या जिल्हा मुख्यालयी सोयी-सुविधांसाठी व दिंडेकऱ्यांसाठी मागणी झाली वारकरी भवनाची!

शेगाव व पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांना एक परिपूर्ण निवारा असावा.. संत-महंतांसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी, किर्तन-प्रवचनासाठी सभागृह असावं अन् त्या परिसरात अध्यात्मिक भाव नांदावा, अशा भव्य ‘वारकरी भवन’ उभारणीसाठी आ.संजय गायकवाड कामाला लागले. यापूर्वी असं एकमेव वारकरी भवन मुंबईतल्या वरळीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुचनेनुसार तयार झालं आहे, आता हे दुसरं वारकरी भवन. आधी ५० लाखांची तरतूद, मग दीड कोटीची.. एवढ्यात हे जमणार नाही म्हणून तब्बल अडीच कोटींची केवळ तरतूदच नाहीतर, ते काम प्रत्यक्षात सुरु करुन दाखवलं संकष्ट चतुर्थीच्या पर्वावर गुरुवार १३ ऑक्टोबरला, उमाशक्तीपिठ वृंदावनचे शंकराचार्य रामादेवानंद सरस्वती, प.पू. हरीचैतन्यानंद स्वामी, दिल्ली येथील हिंदू धर्मप्रचारक श्यामजी महाराज, रामेश्वर महाराज शास्त्री, बाबुराव महाराज वाघ, प्रकाशबुवा जवंजाळ, जगदगुरु तुकोबारायांचे वंशज नितीन महाराज मोरे, तुकाराम महाराज सखारामपूर, योगी अमोलानंद महाराज यांच्यासह अनेक संत-महंत व वारकरी सांप्रदायांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत!

टाळ-मृदंगाच्या गजरात सोत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात संत-महंत यांच्यासह प्रत्येक वारकरी यावेळी आ.गायकवाड यांच्या धर्मरक्षणाच्या कार्यासह विकास कामांवर भरभरुन बोलत होते. स्वामी हरीचैतन्यानंद महाराज यांनी तर ‘संजूभाऊ हे माझ्या हृदयातील एक व्यक्तीमत्व’ असे हृदयापासून उद्गार काढले. वारकऱ्यांची काळजी घेणारा असा आमदार प्रत्येक ठिकाणी असावा, असा हा ‘लिडर पॅटर्न’ ही अनेकांनी बोलून दाखविला. ‘आमदार’ म्हणून झालेल्या कामाचे लोकार्पण ‘नामदार’ म्हणून होवो, अशा अर्थात मंत्रीपदाचा आशिर्वाद सढळ मुखाने शंकराचार्यांनी दिला. त्यामुळे आ.संजूभाऊंनी केलेल्या खाण्याच्या वक्तव्यावरुन उफाळलेला ‘वाद’ हा त्यांच्याच कृतीशिलतेतून संत-महंतांसह वारकरी सांप्रदायांच्या प्रमुखांनी ‘आशिर्वाद’ देण्यापर्यंत पोहोचला, या स्थित्यंतराची नोंद घेण्यासाठी एवढा मोठा हा वृत्तप्रपंच!.. असो, एकच प्रार्थना अशी की उभे राहणारे ठरावे हे, वारकरी भवन.. संस्कारक्षम संस्कृतीचे वहन!!

(श्री राजेंद्र काळे हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी असून, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे नाशिक व विदर्भ विभाग संपादकीय सल्लागार आहेत. संपर्क 9822593923)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!