– लोणार महावितरण विभागाचा गलथान कारभार ग्रामस्थांच्या जीवावर उठला
लोणार (विनोद पाटील तेजनकर) – महावितरणच्या लोणार विभागाचा गलथान कारभार वडगाव तेजन ग्रामस्थांच्या जीवावर उठलेला आहे. विजेच्या जीवंत तारा खाली लोंबकळल्या असून, स्थानिक वायरमनला याबाबत सांगूनही तो तारा ओढण्याचे काम करण्यास तयार नाही. जिल्हा परिषदेची शाळा, किराणा दुकान अशा दोन ठिकाणी तारा लोंबकळलेल्या असून, महावितरण कुणाचा जीव जाण्याची वाट पाहात आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक व व उच्च प्राथमिक शाळा वडगाव तेजन तसेच किराणा दुकानाजवळील जीवंत तारा धोकाच्या ठरत असून, तारा एवढ्या खाली लोंबलेल्या आहेत,की एखाद्या व्यक्तीने स्वतःचे हात जरी वरती केले तर तारेला स्पर्श होऊ शकतो व त्याचा तडफडून जागीच मृत्यू होऊ शकतो. तसेच शाळेच्या संरक्षण भिंतीजवळसुद्धा तार खूप खाली आलेली आहे. एखाद्या वेळेस विद्यार्थी जर संरक्षण भिंतीवरती गेला तर तारेचा स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी विद्युत महामंडळाने त्वरित हे लोबलेले जीवंत तार व्यवस्थित करून पुढील अनर्थ टाळावा, अशी मागणी गावकरी करत आहेत.