Head linesKOLHAPURMaharashtraVidharbha

दिवाळीसाठी कोल्हापूर विभागाने सोडल्या जादा बसेस!

– खासगी प्रवासी वाहतुकीला लगाम बसविणार!

कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – दिवाळी सणाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कोल्हापूर विभागाने येत्या शनिवारपासून पुणे, मुंबई, सोलापूर आणि कोकण मार्गावर जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जिल्ह्यात येणार्‍यांसाठी तसेच जाणार्‍यांसाठी मोठी सोय होणार आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पुण्यासाठी ७० जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. सोलापूर आणि कोकणसाठी ३० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एमएसआरटीसीचे विभागीय वाहतूक नियंत्रक शिवराज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून, साथीच्या रोगामुळे आणि एमएसआरटीसी कर्मचार्‍यांच्या संपामुळे लोकांना दिवाळीसाठी त्यांच्या प्रवासाचे नियोजन रद्द करावे लागले. यंदा सणासुदीला प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार एमएसआरटीसीने या कालावधीत बसेसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या शनिवारपासून कोल्हापूर-पुणे मार्गावर आणखी ७० बसेस धावणार असून, कोल्हापूर विभागातील १२ आगारांतून सोलापूर, पंढरपूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सुमारे ३० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान, कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी प्रवाशांना दिवाळीच्या काळात प्रवास करताना काही गैरसोय झाल्यास किंवा तक्रारी असल्यास एमएसआरटीसी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे. एमएसआरटीसी विभागाच्या ८९९९८०३५९५ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधता येईल.  rto.09-mh@ वर तक्रार नोंदवता येईल. तसेच dycomment@. वर परिवहन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनाही संपर्क साधता येईल.


सणासुदीच्या काळात प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई!

दरम्यान, सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांची अक्षरश: लूट करणार्‍या खासगी वाहनांना चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांनी आदेश काढला आहे. अव्वाच्या सव्वा दर आकारून लूट करत असल्यास तक्रार नोंदवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून व्हॉटसअप क्रमांकही जारी करण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त तिकीट दर घेता येणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!