बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – विदर्भातील एकमेव मुलींची सैनिकी शाळा म्हणजे, राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा. समाधान सावळे यांच्या मार्गदर्शनात ही ‘जिजाऊ’ सैनिकी शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय मुलींच्या सैनिकी शिक्षणासाठी आदर्श असल्याच्या भावना शिक्षण उपसंचालक डॉ.शिवलिंग पटवे यांनी व्यक्त केल्या, विशेष म्हणजे त्यांनी या सैनिकी शाळेला पुर्वसूचना न देता अचानक भेट दिली व शाळेचे शिक्षक अन् व्यवस्थापन पाहून ते भारावून तर गेलेच, पण याठिकाणी त्यांनी खूप वेळ देऊन सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
शिक्षण उपसंचालक डॉ.पटवे यांनी चांधई ता.चिखली परिसरातील जिजाऊ मुलींची सैनिकी शाळेला गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी व्यवस्था व गुणवत्तेची चाचपणी केली. अमरावती विभागातील एकमेव असणाऱ्या राजमाता जिजाऊ मुलींचे सैनिक शाळा अकस्मात भेट देऊन डॉ.पटवेंनी प्रत्यक्ष वर्गात जात विद्यार्थिनींच्या गुणवत्तेविषयी व अभ्यासासंदर्भात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे मुलींना अनेक प्रश्न विचारत शैक्षणिक गुणवत्तेची व शिस्तीची योग्यरीत्या उत्तरे मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
निसर्गरम्य २२ एकर परिसरात प्रशस्त व सर्व प्रकारच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करत असतांना त्यांनी वसतीगृह व भोजनालय, वर्गखोल्या, भव्य क्रीडामैदान आदींचीही पाहणी केली. ९५० मुली निवासी व्यवस्थेत योग्यरीत्या सांभाळ करणाऱ्या व उच्चत्तम दर्जाचे शिक्षण शाळा व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थीनीच्या आरोग्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे विवेक सावळे यांनी डॉ.पटवे यांचे स्वागत केले, त्यांच्या समवेत गटशिक्षणाधिकारी ए.डी.शिंदे तसेच उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक, अधिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थीनीही उपस्थित होत्या.