– अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप एकटा पडला
– भाजपने अंधेरीची पोटनिवडणूक लढवू नये – राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
– भाजप सोडून आम्ही कुणासोबतही जाण्यास तयार; प्रकाश आंबेडकरांची शिवसेनेला टाळी!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलं आहे. शरद पवार यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नव्हता, असं शरद पवार म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. शरद पवारांनी राज्याच्या संस्कृतीचा वारसा दाखवला,असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
मुंबई (प्राची कुलकर्णी) – मुंबईतील अंधेरी पूर्व भागामध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीसाठी भाजप सोडून जो पक्ष आम्हाला पाठिंबा मागेल त्यांना आम्ही अंपाठिंबा देऊ, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या निवडणुकीत मनसे उतरणार नसल्याचे जाहीर करत, भाजपनेदेखील ही निवडणूक लढवू नये, ऋतुजा लटके यांना बिनविरोध आमदार करावे, अशी भूमिका जाहीर करणारे पत्र भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. आंबेडकर व राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकांमुळे उद्धव ठाकरे यांना हत्तीचे बळ प्राप्त झाले असून, भाजप एकटा पडला आहे. या पोट निवडणुकीची जागा बंडखोर शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच भाजपला सोडलेली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाकडून ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होत आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजप तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून, प्रचाराला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत मनसे उतरली तर शिवसेनेच्या मताचे विभाजन होईल, अशी शक्यता होती. परंतु, राज ठाकरे यांनी आपले बंधू उद्धव ठाकरे यांनाच साथ देण्याचा निर्णय घेत, या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. उलटपक्षी भाजपने ही जागा बिनविरोध करावी, असे आवाहन फडणवीस यांना पत्र लिहून केले आहे. त्यामुळे भाजप व शिंदे गट एकटे पडले असून, त्यांचे राजकीय रणनीती फसल्यात जमा आहे. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. पिंपरीमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की ‘राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता, जो पक्ष आमच्या बरोबर यायला तयार आहे, त्यांच्या बरोबर आम्ही जायला तयार आहोत. पण भाजप सोडून सर्व पक्षासाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांना जर खरेच पापक्षालन करायचे असेल तर त्यांनी जाहिरपणे मनूस्मृतीचे दहन करावे, तसे केल्यास आम्ही सदैव तुमच्यासोबत राहू, असे आवाहनच प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला असला, तरी उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातून डमी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. ऋतुजा लटके यांच्यासह संदीप नाईक यांनीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदीप नाईक हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत, तसेच ते शिवसेनेचे अंधेरीमधील माजी नगरसेवकही आहेत. ऋतुजा लटके यांच्या अर्जाच्या तपासणीवेळी काही अडचण आली तर संदीप नाईक अर्ज मागे घेतील, असे अनिल परब यांनी सांगितले. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना दोन अर्ज भरले आहे. एकूण २५ उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. पण मुख्य लढत ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि भाजपमध्ये आहे. तथापि, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे या निवडणुकीत नवा ट्वीस्ट आला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतल्यानंतर आज भाजप नेते आशीष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
या भेटीनंतर काही तासांतच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे. याबाबत फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात राज यांनी नमूद केले, की आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आज अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली होती. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या आमदार झाल्या तर, रमेश यांच्या आत्म्याला शांती मिळेल. भाजपने ही निवडणूक लढवू नये आणि लटके यांच्या पत्नी आमदार होतील हे पाहावे, अशी विनंती आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे. मी आमच्या पक्षातर्पेâ अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे केल्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करत असतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे असे माझे मन सांगते, असेही राज ठाकरे पत्रात म्हणाले. असे करणे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे की आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. राज यांच्या या भूमिकेने भाजपची राजकीय कोंडी झाली असून, ऋतुजा लटके यांच्याप्रती सहानुभूती वाढली आहे. तसेच, राजकीय यांनी नियोजनबद्धपणे भाजपला न दुखवता उद्धव ठाकरे या आपल्या भावाला साथ दिली असल्याची राजकीय चर्चाही मुंबईत रंगली होती.
——————