– लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर येथील दुर्देवी घटना
लोणार (तालुका प्रतिनिधी) – परतीच्या पावसाने सोयाबीन पीक वाया गेल्याने हताश झालेल्या व आर्थिकदृष्ट्या खचलेल्या ३८ वर्षीय तरुण शेतकर्याने आज (दि.१६) भल्या पहाटे स्वतःच्याच शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. संदीप रमेश राठोड, रा. गोवर्धन नगर, ता. लोणार असे या शेतकर्याचे नाव असून, त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा व मुलगी असे अपत्य आहेत. पावसाने खराब झालेली सोयाबीन काल दिवसभर त्यांनी सोंगली. शेतातील शेडमध्ये ते मुक्कामी थांबले. हातातून गेलेले सोयाबीनचे पीक, आर्थिकदृष्ट्या खालावलेली परिस्थिती पाहाता, हताश झालेल्या संदीप राठोड यांनी पहाटे पहाटे गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, राज्य सरकारने तातडीने या कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.
संदीप राठोड यांचे चोरपांग्रा तलावाच्या बाजूला गट नंबर १०६/१० वसनगर शिवारात शेत आहे. हाती आलेल्या सोयाबीन पिकापासून त्यांना मोठा आधार वाटत होता. परंतु, पावसाने सोयाबीन खराब झाले असून, भावदेखील कोसळले आहे. त्यामुळे दिवाळी व सणासुदीची िंचता, आर्थिकदृष्ट्या खचलेली परिस्थिती पाहाता, संदीप यांनी पहाटे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच, सरपंच, पोलिस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. पोलिसांच्या सहाय्याने मृतदेह खाली उतरून शवपरीक्षणासाठी तो पाठवण्यात आला व नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. किनगावजट्टूचे तलाठी व्ही.ई.जायभाये यांनी पंचनामा करून अहवाल लोणार तहसीलदार यांच्याकडे सादर केलेला आहे. मृतक संदीप राठोड यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक सहाय्य देण्याची मागणी पुढे आली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परतीच्या पावसासह अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करून राज्य सरकारने पीडित शेतकर्यांना लवकरात लवकर मदत देण्याची गरज आहे. अन्यथा, नैराश्यात गेलेल्या शेतकर्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे.
——————-