जीवघेण्या अवैध प्रवासी वाहतुकीचा चिखली-देऊळगावराजा मार्गावर धुमाकूळ!
– जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अंढेरा, चिखली पोलिस ठाणेहद्दीत लक्ष घालण्याची गरज!
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातून जाणार्या महामार्ग क्रमांक ए-७५३वर मलकापूर ते देऊळगावराजा मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरु असून, मलकापूर, बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा या मार्गावर हद्द असलेल्या पोलिस ठाण्यांची चांगलीच ‘चांदी’ सुरु आहे. या महामार्गाचे महिन्याकाठीचे कलेक्शन हे एक कोटी रुपयांच्या घरात असावे?, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विशेष करून अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील मेरा चौकी, नवीन टोल नाक्याजवळ अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरु तर आहेच, पण वाळूवाहतूकही जोरात होत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करावी, किंवा गोपनीय पथकामार्फत छापे टाकून अवैध प्रवासी वाहतुकीचे पाळेमुळे खोदून काढावेत, अशी मागणी पुढे आली आहे. या शिवाय, अवैध प्रवासी वाहतुकीचा मलिदा कोण कोणते अधिकारी खात आहेत, याचीही चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
चिखली तालुक्यातील रोड क्रमांक ए ७५३ मलकापूर बुलढाणा चिखली देळगावराजा मार्गावर दररोज अवैद्य प्रवासी वाहतूक गेल्या काही दिवसापासून प्रचंड फोफावली असून, या वाहतुकीमुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे. त्याकडे पोलीस प्रशासन व परिवहन विभागाचे अधिकारी अर्थपूर्णरित्या दुर्लक्ष करीत आहेत. या मार्गावरून वाळू वाहतूक करणारे, क्षमतेपेक्षा जास्त लोड असणार्या वाहनांची संख्याही अधिक आहे. मोठ्या प्रमाणात जडवाहतूक या रोडवरून चालते. या रोडवर नोंदणीची मुदत संपलेल्या वाहनाची वर्दळ जास्त आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही काही ठिकाणी वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खाजगी प्रवासी वाहतूक करणार्याचे संबंध इतके मधुर आहेत, की जाणीव जणूकाही वाहतूक पोलिसांकडून खाजगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही, त्यामुळे एकादी रिक्षा त्याची प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक प्रवासी, ते टॅक्सीला मागून लटकून किंवा वर टपावर बसून प्रवाशांची वाहतूक होताना दिसत आहे. अशा प्रकारच्या वाहनांना कधी एकदा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते, नंतर परिस्थिती पुन्हा जैसे ते होते.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाकडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा गैरफायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे. प्रवासाच्या सोयीनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे, आणि कधी एकाच तासात तीन चार बसेस असणे, असा प्रकार ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. या गैरसोयीने वैतागलेले प्रवासी सरळ खाजगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वाळवतात. ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बसस्थानकांना खाजगी प्रवासी वाहनांचा गराडा पडलेला असल्याने, या गाड्यांचे दलाल बसस्थानकातून प्रवासी पळवण्याचे काम करतात. खासगी वाहतूकदार लहान मुलाचे कोणतेही भाडे घेत नाहीत, शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करण्यात येते. त्यामुळे प्रवासीदेखील जीव धोक्यात घालून खासगी रिक्षा, टॅक्सीमध्ये बसत आहेत. खासगी चालकांवर दिवसातून अधिकाधिक फेर्या करून जास्तीत जास्त पैसे कमविण्याचे टार्गेट आहे. त्यामुळे वाहन चालवताना सुरक्षितेचे नियम ते गुंढाळून ठेवत आहेत. वेगाने व निष्काळजीपणे वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे वारंवार छोटेमोठे अपघात होत आहे.
अवैध प्रवासी वाहनांत प्रवासी अक्षरशः कोंबून भरले जात आहेत. खासगी रिक्षा वीस प्रवासी कोंबून भरली जात आहे तर आठवडी बाजाराच्या दिवशी किंवा लग्नसराईमध्ये खाजगी वाहतूकदारांची चांदीच असते. वाहनाच्या मागे टपावर तसेच पुढील भागावरही प्रवासी बसलेले असतात. ही धोकादायक वाहतूक पोलिसांच्या डोळ्या देखत होत असताना, त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांना ठरावीक हप्ते सुरु असल्यानेच इतकी मुजोरी चढल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी सूचना केली की हेच पोलिस थातुरमातूर कारवाई करतात व त्याचीही पूर्वसूचना या खासगी वाहतूकदारांना मिळालेली असते. वरिष्ठ अधिकार्याने नियमाप्रमाणे ग्रामीण भागात तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा अवैध प्रवासी प्रकारच्या वाहतुकीचा आळा बसू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सदर प्रकार हा अंढेरा पोलीस स्टेशनअंतर्गत मेरा चौकीसमोर, नवीन टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी फक्त वसुलीसाठी रोडवर उभे असतात काय, असा प्रश्न सर्वसाधारण लोकांना पडत आहे.