उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – लाईट गेल्यानंतर तिसरीत शिकणार्या बालकाला अंधारत सर्पदंश झाला. परंतु, त्याच्या जवळ मांजर असल्याने मांजरच त्याला डसली असेल म्हणून, विषारी सापाच्या दंशाकडे घरच्यांनी दुर्लक्ष केले. थोड्याच वेळात नऊ वर्षाच्या या बालकाने मान टाकली व दवाखान्यात नेत असतानाच रस्त्यात जीव सोडला. वेळीच उपचार मिळाले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. उमरगा तालुक्यातील बोरी येथे ही दुर्देवी घटना घडली.
बोरी येथील कुमार ओमकार ज्ञानेश्वर घोडके हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी येथे इयत्ता तिसरीत शिकतो.या मुलास काल (दि.) रात्री साडेनऊ वाजता अचानक लाईट गेल्याने त्यांचवेळेस सर्पदंश झाला. काहींतरी टोचल्याची माहिती त्याने आईस सांगितली पण त्यावेळी घरातील मांजर जवळ असल्यांने मांजरानेच हल्ला केला असल्याचे त्याच्या आईला वाटले व आईने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, थोड्यावेळाने ओमकार मान टाकत असल्याचे दिसून आल्याने, एकच धावपळ उडाली. पोराने मान टाकल्यानंतर त्याला तातडीने उपचासाठी उमरगा येथे घेऊन जात असतानाच, त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या मुलाच्या कुटुंबात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. ओमकार हा एकुलता एक मुलगा असल्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बोरी गावावर शोककळा पसरली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात शवपरीक्षण झाल्यानंतर अंत्यविधी बोरी येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास करण्यात आला.