– निवडणूक आयोगाकडून ठाकरे व शिंदे गटाला चिन्ह वाटप
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर, आयोगाच्या निर्णयाविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर, आज निवडणूक आयोगाने ठाकरे व शिंदे या दोन्ही गटाला तात्पुरते पक्षचिन्ह व पक्ष नाव वाटप केले आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले असून, मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले असून, त्यांनी मागितलेले गदा हे चिन्हा आयोगाने नाकारले आहे. नवीन चिन्हासाठी पर्यायावर आयोग विचार करत होते.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भाजप अशी सरळ सरळ लढत होत असून, या निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार देण्यात आलेला नाही. शिंदे गट हा भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे. त्यामुळे शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविण्यात आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन चिन्ह व नाव यांचे पर्याय आयोगाला सूचविले होते. त्याला खोडा घालण्याासाठी तेच नावे व चिन्हे शिंदे गटानेदेखील सूचवले होते. पैकी, आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यासाठी मशाल हे चिन्ह दिले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव निश्चित केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या कालच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्याने, उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
——————–