BULDHANAChikhaliVidharbha

सौ. कमलबाई (आई) शेनफडराव घुबे यांचे निधन

चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे (धनगर) येथील जानकीदेवी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा बहुजनांच्या गोरगरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणारे शिक्षणमहर्षी शेनफडराव (दादा) घुबे यांना पत्नीशोक झाला असून, त्यांच्या पत्नी कमलबाई (आई) शेनफडराव घुबे (वय अंदाजे ६५) यांचे काल (दि.९) सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’, मुंबई परिवाराने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (दि.१२) सकाळी ९.३० वाजता देऊळगाव घुबे येथेच होणार असल्याचे प्रा. उद्धवराव घुबे यांनी कळवले आहे.

चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगरचे नाव आले म्हणजे एक चित्र उभे राहते, ते म्हणजे जानकीदेवी विद्यालय आणि त्यांचे अध्यक्ष शेनफडराव घुबे आणि त्यांना समर्थपणे साथ देणार्‍या त्यांच्या सुविधा पत्नी कमलबाई यांचे. दहीद बुद्रूक येथील देवकर कुटुंबात कमलबाई यांचा जन्म झाला होता. तीन भाऊ, तीन बहिणी, आई-वडील अशा मोठ्या गोतावळ्यात त्यांचे बालपण गेले. बुलढाणा येथील देवकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. देवकर यांच्या त्या लहान बहीण होत्या. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी देळगाव धनगर येथील घुबे कुटुंब व देवकर कुटुंब यांचे नातेसंबंध जोडले गेले, आणि देळगाव घुबे येथील शेनफडराव घुबे आणि कमलबाई देवकर यांचा विवाह संपन्न झाला. शेनफडराव घुबे सामाजिक कार्यात अग्रेसर आणि शिक्षणाची आवड असल्याने देळगाव घुबेमध्ये त्यांची एक वेगळीच अशी ओळख होती व आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यात तब्बल ५० वर्षे कमलबाई यांनी मोलाची साथ दिली. एका अर्थाने त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सावित्रीबाईंप्रमाणे शेनफडराव दादांच्या त्या सावित्रीबाईच ठरल्यात. कमलबाई यांचे तीस वर्षांपूर्वी छोटसे ऑपरेशन झाले होते, त्यामुळे त्यांची प्रकृती थोडी नाजूक झाली होती. त्यामुळे त्यांची पती शेनफडराव घुबे असतील, उत्तमराव घुबे, भालचंद्र घुबे असे तिघेही बंधू विशेषत्वाने काळजी घेत होते. मोठ्या भावजय असल्याने उत्तमराव व भालचंद्र घुबे यांनी त्यांची आईसमान सेवा केली. कमलबाई ह्या त्यांच्या घरात आई म्हणूनच सर्वांना परिचित होत्या. परिसरातून त्यांना ‘आई’ म्हणूनच संबोधले जात होते, इतका लळा त्यांनी सर्वांना लावला होता.

गावातील कुणाचे सुखदुःख असो, अडचण असो, त्यावेळेस कमलबाई या मदतीला धावून जात असत. शिक्षण संस्थेचा पसारा वाढला तरी त्यांचे मातृहृदय अडीअडचणीतील बायाबापड्यांसाठी कळवळत होते. वयाच्या ६५ व्यावर्षी अगदी अल्पशा आजाराने काल त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या पश्चात पती शेनफडराव घुबे यांच्यासह घुबे परिवार व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. देऊळगाव घुबे, आणि परिसरासह आप्तमंडळीवर दुःखाचे सावट पसरलेले आहे. मिसाळवाडीचे सरपंच विनोद तथा बाळू पाटील, शेळगाव आटोळचे सरपंच डॉ. विकास मिसाळ, साधना न्यूज टीव्ही तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहसंपादक एकनाथ माळेकर यांच्यासह ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’, मुंबई परिवाराने सौ. कमलबाई (आई) शेनफडराव घुबे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!