– पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांसह सर्व नेत्यांकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आजपर्यंत तीनवेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, १९९६ ते १९९८ दरम्यान केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीसुद्धा ते होते. ५५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. १९६७ मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. १९९६ मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली. मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणातही स्वतःला सिद्ध केले होते.
मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे व सर्वच प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलायम सिंह यादव यांना यूरीन इन्फेक्शन झाले होते. मागच्या रविवारी त्यांची ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली होती. त्यामुळे त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून होती. परंतु, आज त्यांची प्राणज्योत मालवली.
—————-