कोजागिरी पौर्णिमा उत्सवाला सप्तशिखरावर लाखोच्या संख्येने देवभक्त कावडधारक व तृतीयपंथी भाविकांचा जल्लोष
वणी/आळंदी (अर्जुन मेदनकर) – श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर कोजागिरी पौर्णिमा उत्सवाला लाखोच्या संख्येने देवभक्त कावडधारक व तृतीयपंथी भाविकांनी उपस्थिती दर्शवून श्री भगवतीच्या दर्शनासह कृपाआशीर्वादाचा लाभ घेतला. दि. ०८/१०/२०२२ रोजी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आदल्या दिवशी शनिवारी, दि. ०८/१०/२०२२ रोजी रात्री ३.०० वाजे पासून भाविकांनी श्री भगवती दर्शनासाठी रिघ लागली. कावड धारकांबरोबरच देवभक्त व तृतीयपंथी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सप्तशृंगगड परिसर भक्तीमय झाला. सर्वत्र देवीचा जागर गोंधळाने सप्तशृंगगड गजबजुन गेला होता.
रविवार सकाळी ८ वाजेपासुन कावडी धारकांसह भाविकांनी शिवालय तीर्थावर एकच गर्दी करून आप आपल्या समूहा बरोबर देवीच्या मंदिराकडे येतांना दिसत होते. आजची श्री भगवतीची सकाळची महापूजा देणगीदार भाविक श्री तुषार पाटील व श्री किसन बल्लाळ यांनी केली. मंदिरात जाण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने दुपारी पायऱ्यामध्ये १५ ठिकाणी बाऱ्या लावून भाविकांना मंदिरात टप्या टप्याने सोडण्यात येत होते. संस्थांनच्या प्रसादालयात भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आणि जवळपास दुपार पर्यंत ३० ते ३५ हजार भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. कावडधारकांना दुपारी १२ वाजेनंतर देवीच्या अभिषेकासाठी शिप्रा, तापी, नर्मदा, गोदावरी, प्रवरा, मुळा, गिरणा आदी सप्तनद्यांचे पविञ नद्यांचे जल घेण्यासाठी संस्थान मार्फत श्री भगवती मंदिरात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व नद्यांचे जल एकत्र करून रात्री ८.०० वा. देवीच्या जलाभिषेकास सुरवात करण्यात येणार असून मध्यरात्री १२.०० वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजेची आरती श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक श्री. वर्धन पी. देसाई यांनी सपत्नीक केली. श्री देवीची आरती होवून कौजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. सर्वत्र बोल अंबे की जय, प्रेम से बोलो, जय माता दी, सप्तशृंगी माता की जय, परशराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय आदी जयघोषणांनी सप्तशृंगगड परिसर दुमदुमून गेला होता.
-तृतीयपंथींचा जागर-
श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगडावर कोजागिरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरतो. या मेळाव्यासाठी सप्तशृंगगडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल झाले. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह, गुजरात व मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता. तृतीयपंथींकडून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना म्हणजे मिरवणूक काढण्यात आली. यानंतर रात्री त्यांचा मेळावा भरला. यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची पंरपरा आहे. शिष्याला दीक्षा देण्याचाही कार्यक्रम झाले. रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन करण्यात आले. तसेच ठिकठिकाणच्या कार्यक्रमात जाऊन तृतीयपंथींनीही नृत्य केले. पौर्णिमेला तृतीयपंथीयांची मोठ्या प्रमाणावर गडावर उपस्थिती असते. सवाद्य मिरवणुकीत सुवर्णालंकार परिधान करून तृतीयपंथी सहभागी होतात. पौर्णिमेला सायंकाळी अभिषेक प्रारंभाची प्रतिवर्षीची परंपरा आहे. रात्री १२.०० वाजता अभिषेक पूर्णाहुती व कोजागरीची सांगता असे नियोजन असते. कावडधारकांना प्रवेशासाठी स्वतंत्र मार्ग असतो. यामार्गावर आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखण्यात आले आहे. तसेच पोलिस प्रशासन, महसूल, विविध शासकीय विभाग व विश्वस्त संस्था कर्मचाऱ्यांच्या सतर्क बंदोबस्तात तृतीयपंथी यांची छबिना व कावडधारकांची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी कळवण तहसीलदार तथा विश्वस्त संस्थेचे विश्वस्त श्री बी ए कापसे, ॲड. श्री. ललित निकम, श्री. भुषणराज तळेकर, व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक श्री प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी श्री भिकन वाबळे, इस्टेट कस्टोडीयन श्री प्रकाश पगार, उपकार्यालाय विभाग प्रमुख श्री गोविंद निकम, मंदिर विभाग प्रमुख श्री नारद अहिरे, भक्तनिवास सहा विभाग प्रमुख श्री शाम पवार, प्रसादालाय पर्यवेक्षक श्री प्रशांत निकम, लेखा अधिकारी श्री भरत शेलार, विद्युत विभाग प्रमुख श्री जगतराव मुंदलकर, बांधकाम विभाग प्रमुख श्री नानाजी काकलीज, वाहन विभाग पर्यवेक्षक श्री संतोष चव्हाण, सहा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री घोडकी, श्री विश्वनाथ बर्डे, श्री सुनील कासार, श्री राजू पवार, श्री सागर निश्चित, श्री मुरली गावित, श्री मुरली गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता श्री. संदीप बेनके, श्री विजय दुबे, श्री अजय दुबे, श्री गिरीष गवळी, श्री राजेश गवळी, श्री गणेश बर्डे, श्री जिवन पवार, सौ. माधुरी कांगने – अप्पर पोलीस अधीक्षक, नाशिक, श्री अमोल गायकवाड – उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण, श्री गणेश मिसाळ – प्र. विभागीय अधिकारी, कळवण, श्री. समाधान नागरे – पोलीस निरीक्षक, कळवण व श्री बंडू कापसे – तहसीलदार कळवण यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त संस्थेचे कर्मचारी, ग्रामस्थ, भाविक – भक्त व शासकीय, निमशासकीय स्वयंसेवी संस्थेतील सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.