लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर तालुक्यातील अरसनाळ महानगाव व सुमठाणा येथील रस्ते हे उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मध्यस्थीने व कुशल कारवाईने अतिक्रमणमुक्त झाले आहेत. या रस्त्यांवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण होते. हे शेतरस्ते मोकळे झाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सविस्तर असे, की अरसनाळ महानगाव येथील अरसनाळ महानगाव ते कुमदाळ हेर या रस्त्याला जोडणारा आठ फुट रुंदी व एक किलोमिटर लांबीचा रस्ता, तसेच सुमठाणा ते मांजरी अंदाजीत तीन किलो मिटर लांबीचा आठ फुट रुंदीचा रस्ता दोन्ही गावच्या शेतकर्यसह स्थळपाहणी करुन संबंधित शेतकरी यांना रस्याचे महत्व व आवश्यकता समजावून सांगून आजच्या चालू परिस्थितीमध्ये यांत्रिक शेतीचा काळ आहे, जनावरांची संख्या खालावत चालली असून, टॅक्टर व यंत्र याचे माध्यमातून शेतीची अवजारे शेतीस घेवून जाण्यासाठी व पीक कापणीनंतर धान्य बाजारपेठेत घेवून जाण्यासाठी शेतीला जाण्यायेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे मार्गदर्शन करुन वरील दोन्ही गावचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले. तसेच माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार, माझा पिकपेरा या ईपिक पाहणी बाबत शेतकरी यांनाच आपल्या शेतीमध्ये हंगामाप्रमाणे केलेली पिकाची नोंद सातबारामध्ये करण्यासाठी मोबाईल अॅपमध्ये नोंदविण याचे आवहान व महत्व सांगण्यात आले. विशेषतः तरुण मुलांनी आपल्या मोबाईलमध्ये गावातील ईपिक पाहणी करीता सहभागी होवून संपुर्ण गावाचे पिक पाहणी शंभर टक्के करावे, असे तरुणांना आवहान करण्यात आले. यावेळी मंडळविभाग देवर्जनचे मंडळ अधिकारी टी.बी. मुसळे, तलाठी दत्ता मोरे, अरसनाळचे चेअरमन महेश मोरे, माजी चेअरमन बाबुराव मोरे, नामदेव माने, विष्णु मोरे, अंकुश भंडारे, शिवाजी तेलगे, बालाजी उटकुरे, शिवाजी पाटील संबंधित रस्ते यांचा लाभ घेणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नागलगावचे मंडळ अधिकारी गणेश हिवरे, तलाठी मेघशाम होळंबे, पोलीस कर्मचारी, भुमी अभिलेख खात्याचे कर्मचारी यांचीदेखील उपस्थिती होती.
———————-