महाराष्ट्राचा ‘घात’वार! नाशिकनंतर वणीत बसने घेतला पेट!
– कुर्ल्यात रहिवासी इमारतीला आग, अनेक जण अडकले
– सांगलीत गाडीला आग, तरूण जळून खाक
मुंबई (प्राची कुलकर्णी) – आजचा शनिवार महाराष्ट्रासाठी घातवार ठरला आहे. आगीच्या तब्बल चार घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला असून, १४ जणांचे बळी गेले आहेत. नाशिकमध्ये खासगी बसच्या अग्नितांडवात १३ प्रवासी ठार झाल्याची घटना पहाटे पहाटे घडली असतानाच, वणीतील सप्तशृंगी गडावर परिवहन महामंडळाच्या बसने पेट घेतल्याची घटना घडली. परंतु, सर्व प्रवासी तातडीने खाली उतरविण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, बस मात्र जळून खाक झाली आहे. दुसरीकडे, कुर्ला येथील रहिवासी इमारतीला दुपारी आग लागली. या आगीत इमारतीतील बरेच कुटुंब अडकून पडली होती. त्यांच्या बचाव कार्याला वेग आला होता. या घटनेत जीवितहानीची शक्यता वर्तविली जात असली तरी, अद्याप तशी माहिती पुढे आली नव्हती. या शिवाय, मनमाड-मालेगाव महामार्गावर मनमाडकडून मालेगावकडे ८ किलोमीटर अंतरावर कुंदलगाव शिवारात हायड्रोजन सिलिंडर घेऊन जाणारे वाहन उलटून, या वाहनातील सिलिंडरच्या टाक्या विखुरल्या. तसेच या सिलिंडरचे स्फोटदेखील झाले. परंतु, वेळीच वाहतूक रोखली गेल्याने, स्फोट व आग यामुळे जीवितहानी झाली नाही. टँकर मात्र जळून खाक झाले आहे. तिकडे सांगलीत, एका तरुणाच्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. या आगीत स्वतः वाहन चालविणार्या त्या तरुणाचा जळून कोळसा झाला आहे. आजचा दिवस उगवतानाच घातवार म्हणून उगवल्याने महाराष्ट्र चांगलाच हादरून गेलेला आहे.
वणी येथील सप्तशृंगी देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बारा वाजेच्यादरम्यान श्री सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतच्या टोलनाक्याजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला (क्रमांक एमएच१४ बीटी ३७५२) शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती.प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व ३३ प्रवाशांना खाली उतरवले. यात्रा नियंत्रण समितीने तातडीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप वे कर्मचारी आदींना घटनास्थळी पाचारण करून फायर एक्स्टिंविशरद्वारे तातडीने आग विझविली. सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचार्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून, सर्व सुरक्षित आहेत. भाविकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही दहातोंडे यांनी केलेले आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सध्या गडावर कोजागिरी पौर्णिमा उत्सावासाठी मोठी भाविकांची गर्दी सुरू आहे.
दरम्यान, आज पहाटे नाशिकमध्ये खाजगी बसला लागलेल्या या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्यावतीने ५ लाख रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जाणार आहेत. या दुर्देवी घटनांची मालिका सुरु असतानाच, सांगलीत गाडी जळून त्यामध्ये एका तरुणाचा मृत्य झाला. चारचाकी गाडी यामध्ये जळून खाक झाली आहे. सांगलीतील खालापूरमधील मगबूल पटेल असे या तरुणाच नाव आहे. आगीच्या घटनांची मालिका दुपारनंतरही सुरुच होती. मुंबईतील कुर्ला येथील रहिवासी इमारतीच्या १३ व्या मजल्याला भीषण आग लागली. या इमारतीमध्ये अनेक कुटुंबे अडकून पडली होती. तर त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, अग्निशमन दलाचे जवान नागरिकांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. तर काही लोकांनी खिडक्यांच्या कठड्यावर आधार घेत, जीव वाचविण्यासाठी धावा करताना दिसत होते.
दरम्यान, मनमाड-मालेगाव रस्त्यावर मनमाडकडून मालेगावकडे हायड्रोज सिलिंडर घेऊन जाणार्या टँकरचा अपघात झाल्यानंतर त्यातील काही सिलिंडरचा स्फोट होऊन पेट घेतला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खबरदारी म्हणून थांबवण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ३ ते ४ किलोमीटर वाहतूक जाम झाली होती. या अपघातामुळे चोंडी घाटदेखील जाम झाला होता. आणखी स्फोटाची शक्यता पाहाता, कोणाला त्या परिसरात जाऊ दिले जात नव्हते. अपघातानंतर लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली होती.
————–