– बसची आयशर टेम्पोला धडक, डिझेलच्या टाकीचा स्फोट होऊन लागली भीषण आग
– पहाटे साडेचार वाजता झोपेतच प्रवाशांवर काळाचा घाला!
नाशिक (ब्रेकिंग महाराष्ट्र चमू) – नाशिक शहरात नांदूर नाक्याजवळ (मिरची हॉटेल) आज भल्या पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सची खासगी बस आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात बसच्या डिझेलच्या टाकीचा स्फोट होऊन बसला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 प्रवासी जळून खाक झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे, तर 34 प्रवासी होरपळून गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा प्रशासनाने नाशिकमधील विविध रुग्णालयात दाखल केलेले आहे. बहुतांश प्रवाशांनी बसमधून उड्या मारून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या नाशिकमधील टीमने अपघातानंतर काही तासांत घटनास्थळी धाव घेतली असता, अतिशय विदारक चित्र होते. प्रवासी किंचाळत होते, तर त्यांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, पोलिस व सुरक्षा यंत्रणा अटोकाट प्रयत्न करत होती. या दुर्देवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी तातडीने मदत जाहीर केली आहे.
ही दुर्देवी घटना नाशिक-औरंगाबाद मार्गावरील नांदूरनाका जवळ घडली. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. तब्बल ५० प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसने चौक ओलांडत असताना समोरून येणार्या आयशर ट्रकला धडक दिली. त्यामुळे बसच्या डिझेल टाकीचा स्फोट झाला. सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात टाकीतील डिझेल उसळून संपूर्ण बसला भीषण आग लागली. त्यामुळे किंचाळ्या, आरडाओरड यामुळे परिसरात एकच हल्लकल्लोळ उडाला. घटनास्थळी जमा झालेल्या इतर वाहनधारकांनी आपली वाहने थांबवून बचावकार्य हाती घेतले. तसेच, तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अर्धवट होरपळलेले प्रवासी बसमधून उड्या मारत होते. तसेच, अनेक जण रस्त्यावर विव्हळत पडलेले होते. प्रवाशांच्या अंगावर डिझेल उडाल्याने त्यांना आगीने आपल्या कवेत घेतले होते. त्यामुळे अनेकजणांचा बसमध्येच जळून कोळसा झाला होता. बसच्या पुढील भागाला आगीचा सर्वात मोठा फटका बसला. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी साखर झोपेत होते. झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे अनेकांना जीव वाचविण्यासाठी हालचाल करण्याची संधीदेखील मिळाली नाही. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चालकासह, लहान मुले, महिला यांचा समावेश आहे.
या दुर्देवी घटनेनंतर बचाव व मदतकार्य तातडीने हाती घेण्यात आले होते. जखमींना खासगी तसेच सरकारी रुग्णालयांत हलवण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील नाशिककडे रवाना झाले होते. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाच्या मदतीची घोषणा तर केलीच पण जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही जाहीर केले आहे. हे वृत्त लिहिपर्यंत 13 प्रवासी ठार झाले होते, आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक होती, त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठीत ट्वीट करत, या दुर्देवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी नमूद केले, की – या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन जखमींना सर्व प्रकारची मदत करतील, असा मला विश्वास आहे. या अपघातातील मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान निधीतून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मृतामधील फक्त दोन प्रवाशांची ओळख पटलेली असून, इतर प्रवाशांची ओळख पटविणे मुश्किल असल्याने त्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर फॉरेन्सिक टेस्टही करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे. आताच्या घडीला पोस्टमार्टम करून त्यांच्या ओळख करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. या व्यतिरिक्त आपण प्रशासनमार्फत प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी टोल प्रâी नंबरदेण्यात आला आहे. बसला आग लागल्याच्या घटनांसंदर्भांत कठोर पाऊले उचलण्यात येऊन यासाठी पोलीस प्रशासन आणि आरटीओ आणि इतर स्थानिक प्रशासन सोबत चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी सांगितले.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा, अतिशय भयंकर अशी ही आग असल्याचे दिसून आले. पूर्ण बस पेटलेली असताना प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बसमधील लोकांना बाहेर पडायला मार्ग नव्हता. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच बंबांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक प्रवाशांचा जळून मृत्यू झाला हाेता.
——————-
—