– परराज्य व परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांचीही पावसाने रोजीरोटी हिरावली
चिखली (तालुका प्रतिनिधी) – परतीच्या पावसाने चिखली तालुक्यातील मेरा, अंत्री खेडेकर, मनुबाई गुंजाळा, कवठळ, चंदनपूर, कठोड या भागात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकर्यांचा एकरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्या साधनाताई खेडेकर यांनी केली आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे हाती आलेले सोयाबीनचे पीक शेतकर्यांच्या हातातून गेले असून, आता जर वेळीच मदत मिळाली नाही, तर शेतकरी उद््ध्वस्त होतील, असेही त्या म्हणाल्यात.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना साधनाताई खेडेकर म्हणाल्यात, की चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर, मेरा बुद्रूक, मेरा खुर्द, मनुबाई गुंजाळा, कवठळ, चंदनपूर काठोड या भागामध्ये परतीच्या पावसाने शेतीचे खूप नुकसान केले आहे. शेतीमधील सोयाबीन पीक सोंगणीच्या वेळीच हा पाऊस झाल्याने शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे. निसर्गाने अखेर शेतकर्यावर आत्महत्या करण्याची पाळी आणली आहे. दसरा झाला, आता दिवाळी येणार असल्याने शेतकरी आपले स्वप्न रंगवत असतानाच, अचानक निसर्गाच्या प्रकोपामुळे सोयाबीनचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मेरा, अंत्री खेडेकर येथील बाहेर राज्यातून तसेच बाहेर जिल्ह्यातून गोंदिया, साकोली, भंडारा घाटाखालून मजुर आलेला आहे. परंतु अचानकच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. सोयाबीन सोंगण्यास व्यत्यय येत असल्यामुळे या बाहेरील मजुरावर उपासमारीचे पाळी आली आहे. बाहेर जिल्ह्यातील मजूर अंत्री खेडेकरमध्ये चार ते पाच वर्षापासून येतात. गावातील लोकांनी त्यांचे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे हे मजुर चार ते पाच वर्षापासून सोयाबीनच्या सिझनसाठी मेरा अंत्री खेडेकर भागामध्ये येत आहे. परंतु यावर्षी निसर्गाच्या प्रकोपामुळे सोयाबीनच्या शेतात पाणी आणि सोयाबीन सोगण्यासाठी खूप मोठे अडचण येत आहे, त्यामुळे त्यांचे कामे बंद पडले आहे. ज्या शेतकर्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना मदत मिळेलच, परंतु ज्या शेतकर्यांनी पीक विमा काढला नाही त्यांनासुद्धा एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्या साधनाताई खेडेकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.