BULDHANAChikhaliVidharbha

शेतकर्‍यांच्या मागण्या ५ नाेव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; अन्यथा, ६ नोव्हेंबरला सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा बुलढाण्यात एल्गार मोर्चा

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सोयाबीनला प्रति क्विंटल ८ हजार ६०० रुपये आणि कापसाला प्रति क्विंटल १२ हजार ३०० रुपये स्थिर भाव राहावा, यासाठी केंद्र सरकारने तात्काळ आयात-निर्यातीच्या धोरणात बदल करावा, या प्रमुख मागणीसह सोयाबीन-कापूस उत्पादकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला ५ नोव्हेंबरची आमच्याकडून मुदत देत आहोत. तोपर्यंत मागण्यांची पूर्तता करा; अन्यथा ६ नोव्हेंबरपासून पुढचे दिवस सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी राज्य व केंद्र सरकारला दिला आहे. कापूस व सोयाबीनचे भाव प्रचंड गडगडल्याचे वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित करून याप्रश्नी शेतकरी नेत्यांसह राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची शेतकरी नेत्यांसह प्रमुख राजकीय पक्षांनीही दखल घेतली असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

कापूस आणि सोयाबीनची भाववाढ आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांच्या नेत्तृत्वाखाली येत्या सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी भव्य एल्गार मोर्चा काढणार असून, गेल्या वर्षीदेखील शेतकर्‍यांनी भाववाढीच्या मुद्द्यावर मोर्चा काढला होता. यासंदर्भात तुपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी वायदेबाजार सुरु करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, कापूस व सूत निर्यातीला प्रोत्साहन देण्यात यावे, मागील व चालू वर्षातील पिकविमा देण्यात यावा, शेतकर्‍यांना हेक्टरची मर्यादा न ठेवता हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात यावी, १५ लाख मेट्रिक टन सोयाबीनची निर्यात करावी आणि खाद्यतेलावरील आयातशुल्क ३० टक्के करावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या मागण्या सरकारने पाच नोव्हेंबरपर्यंत पूर्ण न केल्यास तर सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी भव्य मोर्चा काढतील. त्यामुळे आता सरकारनं जो काही निर्णय घ्यायचा तो पाच नोव्हेंबरच्या आत घ्यावा, अन्यथा सहा नोव्हेंबरचा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी राज्य व केंद्र सरकारला दिला आहे.

सध्या सोयाबीचा बाजारभाव ३५०० ते ४५०० रुपये आहे तर कापसाचा बाजारभाव ७००० ते ८००० रुपये आहे. यावर्षी सोयाबीनला एकरी ३४ हजार ७०० रुपये उत्पादन खर्च आला आहे, म्हणजेच प्रतिक्विंटल ५ हजार ७८३ रुपये उत्पादन खर्च आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या सूत्रानुसार सोयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार ६०० रुपये आणि यावर्षी कापसाला एकरी ४० हजार ९२० रुपये उत्पादन खर्च आला आहे, म्हणजेच प्रतिक्विंटल ८ हजार १८४ रुपये उत्पादन खर्च आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या सूत्रानुसार कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार ३०० रुपये स्थिर भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाने तसे धोरण तयार करावे, अशी मागणी तुपकर यांनी केलेली आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!