BREAKING NEWS! भीती होती तेच झालं, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवलं!
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा निर्णय आला आहे. या देशात ‘महाशक्ती’ अस्तित्वात असल्याचा परिचय यानिमित्ताने देशाला आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवले असून, उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. अंधेरी पोटनिवडणूक ३ नोव्हेंबररोजी होणार आहे. चिन्हासंदर्भातील अंतिम निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे. ‘शिवसेना’ हे पक्षाचे नावही दोन्ही गटांना वापरता येणार नाही. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडेपर्यंत दोन्ही गटांना हे निर्बंध लागू असणार आहेत. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना आयोगाला पर्याय द्यावे लागणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना-शिंदे गटाने कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणुक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले असून ते रद्द केलेले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने गेल्यास धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा ठाकरे गटाला मिळू शकेल. मात्र या जर तरच्या बाबी आहे. अंधेरी पूर्व येथे होणार्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह धनुष-बाणावर दावा सांगितला होता. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक चिन्हाचा हा वाद लवकर निकाली काढणे आवश्यक आहे. कारण उद्धव ठाकरे गट आपल्या उमेदवारांसाठी धनुष्य-बाण चिन्हावर दावा करू शकते, असेही पत्रात नमूद केले होते. आता, निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कमी दिवस उरलेले असल्यामुळे तूर्तास तो पर्याय नसेल, असे जाणकारांचे मत आहे.
ठाकरे गटाने आज त्यांच्याकडील महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगात सादर केली होती. शिवाय, अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केला होता. शिवाय, शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असे ठाकरे गटाने म्हटले होते. आमच्याकडे राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकार्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत. फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असा दावा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर केला होता. दोन्ही गटांच्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
‘आम्हाला अजिबात धक्का बसलेला नाही. यापूर्वीच अशी चर्चा होती की चिन्ह गोठवणार. मॅचफिक्सिंगची चर्चा सगळीकडे होतीच त्यामुळे आम्हाला काही धक्का बसलेला नाही. या देशात आता असंच होणार आहे. आम्ही पुढे काय करणार हे असं लगेच सांगता येणार नाही. आम्ही मंथन करू. पण शेवटी पक्ष आहे, उद्धव ठाकरे आहेत.’
– मनीषा कायंदे, प्रवक्त्या शिवसेना
——————-