उदगीर (संगम पटवारी) – तब्बल ५९ दिवसांपासून मराठी पत्रकार संघ व इतर पत्रकार उदगीर शहरातील नांदेड-बिदर रोडवरील शंभर फुटाच्याआतील अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन करत असून, आता हे आंदोलन पत्रकारांच्या जीवावर बेतण्यास सुरुवात झाली आहे. पत्रकार संदीप पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. तरीदेखील जिल्हा प्रशासन डोळ्यावर गेंड्याची कातडी पांघरून बसले असून, अद्यापही अतिक्रमण काढण्यासाठी काहीही हालचाल होत नसल्याने पत्रकारांसह शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाटील यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
मागील ५९ दिवसापासून उदगीर शहरातील नांदेड-बिदर रोडवरील शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी मराठी पत्रकार संघ व इतर पत्रकारांच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आता हे धरणे आंदोलन पत्रकारांच्या जीवावर बेतले असल्याचे दुर्देवी चित्र आहे. शहरातील हे अतिक्रमण हटवून रस्ता व नालीचे कामे करावे, अशी पत्रकारांची मागणी आहे. या मागणीसाठी पत्रकारांनी राज्यपाल, आयुक्त, जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदने देऊन वारंवार विनंती करूनसुद्धा या मागणीची पूर्तता करण्यात आली नाही. अखेर पत्रकारांनी धरणे आंदोलन सुरु केले. आजरोजी आंदोलनाच्या ५९ दिवसानंतरदेखील उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पत्रकारांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनातील ठिकाणी पत्रकार पाऊस, ऊन, वारा, थंडी सहन करून आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे पत्रकार संदीप पाटील यांची तब्येत खालावली असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तरी, जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही तर हे आंदोलन पत्रकारांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. प्रशासनास आतातरी जाग येईल का ? असा सवाल उदगीरकर करत आहेत. वेळीच पत्रकारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र पत्रकार राज्य पातळीवर आवाज उठवून राज्यातील शिंदे सरकारला जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.
————–