– ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्यास प्रशासनाचा नकार, वाद चिघळणार!
– पहिल्याच दिवशी बंदला मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद, अत्यावश्यक सेवा मात्र सुरु!
गडचिरोली (शिवा पवार) – सुरजागड लोह खदानीच्या वाहतुकीमुळे तथा धुळीमुळे त्रस्त झाल्याने आलापल्ली येथील व्यापारी संघटनेने आजपासून बेमुदत व्यापारपेठ बंद ठेवली होती, हा बंद शंभर टक्के यशस्वी राहिला असून शाळा, महाविद्यालय तसेच पेट्रोल पंप सोडून इतर सर्व प्रतिष्ठाने बंद होती. या बंद मध्ये चहा टपरी, हॉटेल व्यवसायिक, पानठेला चालक, भाजी विक्रेते, किराणा व्यवसायिक, डॉक्टर आणि फार्मसी यासुद्धा स्वयंस्फूर्तीने बंद होत्या. आज वन विभाग विश्राम गृह आलापल्ली येथे व्यापारी संघटना आणि सुरजागड लोह खदान अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी तानाजी पाटील, आशिष घोनमोडे शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, सुदर्शन राठोड प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांच्या सोबत झालेल्या दीड तासाच्या बैठकीत कसलाही तोडगा निघाला नाही.
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोह प्रकल्पातून लोहयुक्त असलेला चुरा, दगड सूरजागड येथून मोठमोठ्या वाहनांद्वारे आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावरून नेणे सुरू आहे. क्षमतेपेक्षा दुप्पट लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे आलापल्ली ते आष्टीपर्यंतचा संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर मोठ-मोठे खड्डांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने लोहयुक्त दगड व चुरीच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्याचे निराकरण करावे, अशी मागणी आलापल्ली व्यापारी संघटनेच्यावतीने २९ ऑगस्ट २०२२ ला शासन प्रशासनला निवेदन दिले होते. परंतु या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे त्रस्त होऊन शेवटी व्यापारी संघटनेने दिनांक १२ सप्टेंबरपासून बेमुदत व्यापारपेठ बंद केली आहे. आज वन विभाग विश्राम गृह आलापल्ली येथे व्यापारी संघटना आणि सुरजागड लोह खदान अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी तानाजी पाटील, आशिष घोनमोडे शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, सुदर्शन राठोड प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांच्यासोबत झालेल्या दीड तासाच्या बैठकीत कसलाही तोडगा निघाला नाही. प्रशासन आणि सुरजागड लोह खदान कंपनी व्यापारी संघटनेच्या कोणत्याही मागण्या मान्य करायला तयार नसून तर दुसरीकडे रोज कुठे ना कुठे जीवितहानी होत आहे. यामुळे सामान्य नागरिक आणि व्यापारी वर्ग त्रस्त झाले आहेत.
लोह खानिच्या उत्खनन वाहतुकीमुळे सर्वं त्रस्त झाले आहे, आलापल्ली गावात फार मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आणि पाच ्तालुक्याला जोडणारा मध्यस्थळ असून, सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. आलापल्ली या ठिकाणी जिल्हापरिषद शाळा २, अंगणवाडी-१२, इंग्लिश मिडीयम स्कुल शाळा एकूण ०४, हायस्कुल – ०३ कॉलेज- ०४, इंग्लिश मिडीयम स्कुल ४ आहेत. एकूण विदयार्थी संख्या ४ हजार ते ५ हजार आहे. शाळेत जाणे येणे करीता मुख्य रस्ता एकच असून विद्यार्थीचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास जबाबदार कोण असणार? आलापल्ली या गावात धुळीचे साम्राज्य फार मोठ्या प्रमाणात आहे, आणि मार्ग हा खडेमय झालेला आहे. गावातील प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे १. एटापल्ली रोड ते नागेपल्ली पर्यंत धुड/ माती समस्या. २. एटापल्ली रोड ते नागेपल्ली सिमेंट रोड बनविणे, ३. एटापल्ली रोड ते नागेपल्ली स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे, ४. लवकरात लवकर बायपास मार्ग काढणे, ५. खानितील गाडीवर त्रिपाल झाकणे. ६. सकाळी १० ते सायकाळी ०५ वाजता पर्यंत मालवाहतूक गाडी बंद ठेवणे, ७. आलापल्ली नागेपल्ली येथिल सर्व विदयाथीचा अपघात झाल्यास नुकसान भरपाईची तरतुद करणे. ८. जडवाहणे वाहतुक नियंत्रण कक्ष तयार करण्यात यावे, या मागण्याचा वारंवार पाठपुरावा करूनही निराकरण न झाल्याने दि. १२ सप्टेंबरपासून सर्वं व्यापारी मिळून बेमुदत व्यापारपेठ बंद ठेवणार आहे, अशी माहिती आज सायंकाळी झालेल्या पत्रकारपरिषदेत आलापल्ली ग्रामपंचायतचे सरपंच, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी सार्वजनिक विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थविरुद्ध प्रशासन असा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
—————