पैठण (शिवनाथ दौंड) – पैठण तालुक्यातील आडुळ जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेचा दर्शनी भाग टापटीप आहे, सभोवतालचा परिसर कोण बघतोय?, शाळेच्या सभोवताली शौचालय व्यवस्थित नसलेला परिसर, असलेली घाण, ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा पैठण तालुक्यातील आडुळ येथे आहे. गेल्या काही वर्षांपासून याच स्थितीत विद्यार्थी अध्ययन करत आहेत. आजतागायत अनेक अधिकारी, पदाधिकारी होऊन गेलेत. मात्र त्यांना या शाळेविषयी कळवळा येऊ नये, याचे नवल वाटते. प्रशासन कदाचित एखाद्या दुर्घटनेची वाट तर बघत नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. ” अखेर साहेब तुम्हीच सांगा, आम्ही शौचालयात कसं जायचं ” अशी विद्यार्थ्यांनी आर्त हाक दिली आहे.
आडुळ येथील प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते १० पर्यंतचे वर्ग भरतात. या शाळेत चिमुकले शिक्षण घेत आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीमार्फत कॉन्व्हेंटचे वर्गसुद्धा येथे भरतात. आडुळमध्ये शौैचालयापासून दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. शौचालयाच्या सभोवताली अडचण कचरा व सतत बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शौचालयात ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण होतो. एखादी दुर्घटना किंवा रोगराईच्या घटना घडल्यानंतर कुंभकर्णी निद्रावस्थेत असलेल्या प्रशासनाला जाग येईल का? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. पुरोगामी महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीचे गोडवे मोठ्या गौरवाने गायले जातात. नव्हे हे युग शिक्षणाचे असल्याचे म्हटले जाते. शाळा आहे, शिक्षण नाही. शिक्षण केवळ कागदोपत्री आहे ही बाब सर्वश्रुत आहे. शिक्षण तर सोडाच पण, आपण शिक्षणासाठी पाठविलेले बाळ शाळेत तरी सुरक्षित आहे का, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. यात शिक्षकांचा मुळीच दोष नाही. दोष आहे व्यवस्थेचा. या चिमुकल्याना अश्या शौचालयात जावे लागते यापेक्षा दुर्दैव कोणते?