Uncategorized

चोपडाच्या आमदार सौ. लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात!

– सौ. सोनवणे यांची आमदारकी रद्दची प्रक्रिया आता तातडीने करा – माजी आ. वळवी

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला आज जोरदार झटका बसला आहे. त्यांच्या गटाच्या चोपडा येथील आमदार लता सोनवणे यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे सोनवणे यांची आमदारकी रद्द होणे निश्चित आहे. शुक्रवारी, ९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्यायमूर्ती के.एम. जोसेफ व न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांनी आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे.

सौ. लता सोनवणे यांनी २०१९ ला शिवसेनेकडून निवडणूक लढवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीनंतर वळवी यांनी सोनवणे यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याबाबत अर्ज दाखल केला होता. त्यामुळे नंदूरबार जात पडताळणी समितीने लता सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात सौ. सोनवणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, तेथेदेखील त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. यानंतर त्यांनी पुन्हा खंडपीठात दाद मागितली होती. परंतु, तेथेही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयानेदेखील उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत, सौ. सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली. यामुळे आमदार लता सोनवणे यांना मोठा झटका बसला आहे. जातप्रमाणपत्रच अवैध ठरल्याने लता सोनवणे यांनी राखीव जागेवर निवडणूक लढवून मिळवलेली आमदारीच धोक्यात आली आहे.

याबाबत आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले, की आमदारकी कुठेही गेलेले नाही, आमदारकी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका फेटाळून लावली आहे. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात ती पुन्हा रीओपन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असा विश्वास आहे, असे चंद्रकांत सोनवणे म्हणाले. तर, उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला आहे. आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग व प्रशासनाची आहे. ती जलदगतीने व्हावी. आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस मागणी आहे. तसेच विधानसभेत दोन नंबरच्या उमेदवाराला विजय घोषित करावे, असे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले.


आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी त्यांचे टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. परंतु, समितीने चौकशी केली नव्हती. त्यामुळे वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत, सौ. सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदूरबार येथील जातपडताळणी समितीला चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचे स्पष्ट झाल्याने ते रद्द करण्यात आले होते. त्याविरोधात सौ. सोनवणे या औरंगाबाद खंडपीठात गेल्या. तेथे त्यांना दिलासा मिळाला नाही म्हणून त्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा न देता, उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. सौ. सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!