मेहकर (तालुका प्रतिनिधी) – सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मेहकर तालुक्यातील बदनापूरच्या युवा शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज, १० सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. गणेश मारुती आसोले (वय ४०, रा.बदनापूर, ता.मेहकर) असे आत्महत्या करणार्या शेतकर्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गणेश आसोले यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यावरच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र सततची नापिकी, शेतीचा वाढता खर्च यामुळे अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यामुळे ते नैराश्यात होते. राज्य सरकार मदतीची फक्त घोषणा करते पण प्रत्यक्षात हाती काहीच येत नाही, व आर्थिक दिलासादेखील मिळत नाही. त्यामुळे खचलेल्या गणेश आसोले यांनी कुटुंबातील सर्वजण झोपेत असताना रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास गावाशेजारील गोंधनाच्या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा केला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतक शेतकरी गणेश आसोले यांच्या पश्च्यात पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. त्यांच्या या दुर्देवी मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. राज्य सरकारने तातडीने त्यांच्या पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, व त्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
—————–