पिंपरीतील धक्कादायक घटना ! अपहरण झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा खून, बिल्डरकडे मागितली होती 20 कोटीची खंडणी
पिंपरी चिंचवड/ पुणे (युनूस खतीब) – बेपत्ता झालेल्या सात वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाचा शोध सुरु केला. मात्र, अपहरण झालेल्या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अपहरणकर्त्यांनी बांधकाम व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांकडे 20 कोटीची खंडणी मागितली होती. आदित्य गजानन ओगले (वय-7) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील गजानन श्रीकांत ओगले (वय-49 रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी 8 सप्टेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपी मंथन किरण भोसले (रा. मासुळकर कॉलनी पिंपरी) आणि अनिकेत श्रीकृष्ण समुद्रे (रा. घरकुल, निगडी) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य गुरुवारी सायंकाळी खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी आला नसल्याने आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडत नसल्याने वडिलांनी पिंपरी पोलिसांकडे धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन गुंडा विरोधी पथकाने सोसायटीत राहणाऱ्या आरोपी मंथन याच्याकडे कसून चौकशी केली. सुरुवातीला मंथन याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, तपास पथकातील हरीश माने यांनी मंथन याला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी मंथन याने साथीदार अनिकेत याच्या मदतीने आदित्यचा गळा दाबून खून करुन मृतदेह भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीच्या पडक्या इमारतीच्या टेरेसवर फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आदित्यचा मृतदेह ताब्यात घेतला. मयत आदित्य याचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी त्यांच्याकडे वीस कोटी रुपये खंडणी मागितली होती. त्यामुळे आरोपींनी आदित्याचा पैशासाठी खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत. परंतु पोलिसांनी यामध्ये वेगळाच संशय व्यक्त केला आहे. कारण आरोपी आणि ओगले हे एकाच सोसायटीत राहत होते. त्यामुळे त्यांच्यात काही वाद होते याचा तपास पोलीस करीत आहेत.
आदित्यच्या कुटुंबीयांचा बदला घेण्याच्या भावनेतून हे कृत्य केल्याची कबुली संशयित आारेपी मंथनने दिली आहे. आदित्यची नातेवाईक असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता आणि याच रागातून आदित्यची हत्या केली असावी, अशी शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी दिली. या घटनेतील मुख्य आरोपी मंथन हा आदित्यच्याच सोसायटीत राहायला आहे. मंथन याचे आदित्यच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. या प्रेमाला घरातून विरोध होत असल्याने अनेकदा भांडणे देखील झालेली होती. त्याचा राग मनात धरूनच मित्राच्या मदतीने मंथन याने आदित्यच्या अपहरणाचा कट रचला. मंथन याने अपहरण करण्यासाठी मोटारीला टिंटेड ग्लास लावली. आदित्य इमारतीच्या खाली खेळायला येताच त्याने आदित्यला गाडीच्या जवळ बोलवले आणि गाडीच्या जवळ येताच त्याने त्याला गाडीत ओढून त्याचं नाक-तोंड दाबून त्याचा खून केला.