– अंत्री खेडेकर ग्रामपंचायतीने स्मशानभूमी स्वच्छतेकडे केले होते दुर्लक्ष!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – राजकीय व व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचे गाव आणि मोठी ग्रामपंचायत असलेल्या अंत्री खेडेकर येथील स्मशानभूमीच्या परिसरात गाजर गवताचा उद्रेक झाला होता. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने गाजर गवताची मोठीच समस्या निर्माण झाली होती. या बाबत ग्रामविकास अधिकार्यास विचारणा केली असता, त्यांनी अत्यंत उर्मटपणे उत्तर देऊन, ‘माझी तक्रार करा, मला बदलीच पाहिजे’, असे सांगितले होते. त्यामुळे अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांनी श्रमदान करत, स्मशानभूमीतील गाजरगवत उपटून काढत, स्वच्छता केली.
चिखली तालुक्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या बुलढाणा जिल्ह्यावर अधिराज्य गाजवणारे गाव म्हणजे अंत्री खेडेकर हे होय. दिनांक १ सप्टेंबररोजी येथील माळेकर परिवारातील स्वर्गीय तुळसाबाई सदाशिव माळेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले असता, स्मशानभूमीतील चित्र पाहून सर्वांना अस्वस्थता वाटली. पाहुणे मंडळी यांना बसावे किंवा ऊभे रावे असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण, स्मशानभूमीत चोहीकडे गाजर गवत माजलेले दिसून आले. गावातील प्रतिष्ठित मंडळीसुद्धा यावेळी हजर होते. गौरी आगमनाचा दिवस असल्यामुळे सावडण्याचा कार्यक्रमदेखील तिसर्याच दिवसी ठेवण्यात आला होता. १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर या कालावधीत गावातील सतीश मदनराव खेडेकर व मित्र मंडळ व माळेकर परिवारातील सदस्यांनी श्रमदानातून एका दिवसात स्मशानभूमीतील गाजरगवत साफ केले व स्मशानभूमीची स्वच्छता केली. या कामाचे गावातील लोकांच्या तोंडून कौतुक होत आहे. या स्मशानभूमीतील गाजरगवत जाळण्यासाठी ग्रामपंचायतीने दोन वेळेस औषध मारले होते. परंतु या औषधाने गाजरगवत जळाले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतने निकृष्टदर्जाचे औषध फवारले असावे, असा सूर गावात उमटला आहे. दरम्यान, ज्या दिवशी स्मशानभूमीची ग्रामस्थ व सतीश खेडेकर मित्र मंडळाने स्वच्छता केली, त्याच दिवशी या स्मशानभूमीमध्ये पिंपळाचे एक झाडसुद्धा लावण्यात आले आहे.