Breaking newsMumbaiWorld update

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात धक्कादायक मृत्यू

– महाराष्ट्र सरकारकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश
मुंबई(ब्रेकिंग महाराष्ट्र) – टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि मोठे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघर येथे अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांची मर्सिडीज गाडी डिव्हायरडला धडकल्याने हा अपघात झाला असून, तो संशयास्पद दिसून येत आहे. राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 54 वर्षीय मिस्त्री यांच्या मर्सिडीजमध्ये चौघेजणं होतं. या अपघातात मिस्त्रींसह दोघांचा मृत्यू झाला.
मुंबईतील पालघरच्या चारोटी परिसरात हा अपघात झाला. या अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यांच्यासोबत असलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणाची अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सायरस मिस्त्री हे २०१२ ते ऑक्टोबर २०१६ या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते. लंडनमधील इंपिरियल महाविद्यालयातून सायस मिस्त्री यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले होते. टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता.सुशासन आणि पारदर्शकी व्यवस्थापनाचा आग्रह धरणार्‍या सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहावर गंभीर आरोप केले होते. टाटा समूहाला २०१९ मध्ये १३ हजार कोटींचा तोटा झाला होता मात्र तो त्यांनी लपवला, असा आरोप मिस्त्री यांनी केला होता. तीन दशकांत पहिल्यांदाच टाटा समूहाला इतका प्रचंड तोटा झाला असून, तो त्यांनी लेखा परीक्षणात दडवला, असा दावा मिस्त्री यांनी कोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात केला होता. याच वादातून २०१६ साली त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मिस्त्री यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी योग्य ठरवली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत या अपघाताची चौकशी सरकार करत असल्याची माहिती दिली आहे. ‘प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति ! पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.’ असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे.  या अपघातात सायरस मिस्त्रींसह जहांगीर दिनशा पंडोले यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनायत पंडोले (कार चालक) आणि तिचे पती दरीयस पंडोले जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!