▪️ ज्यांच्या नेतृत्वात आले, त्यांच्याच नेतृत्वाला आव्हान?
राजेंद्र काळे
शिवसेनेतील दोन्ही गटांकडून आता ‘नियुक्तीसत्र’ हे ‘नियुक्तीपत्र’ देवून सुरु झाले आहे. असे असतांना ‘लक्षवेधी’ ठरत आहे ते, शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील जिल्हा संपर्कप्रमुख असलेले खा.प्रतापराव जाधव व प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्यातील भावी थेट संघर्ष. लोकसभेसाठी प्रतापरावांचं प्रतिस्पर्धी म्हणून नरुभाऊंची गणना सोशल मिडीयातून प्रामुख्याने होवू लागली आहे. त्यामुळे या राजकीय संघर्षाला रुप आले आहे ते, प्रतापगड विरुध्द रायगड?
प्रतापगड, अर्थात मेहकर मतदार संघ. प्रतापराव जाधव यांचा हा बालेकिल्ला.. म्हणून त्याला ‘अभेद्य प्रतापगड’ म्हणतात. रायगड, चिखलीत बांधलेल्या बंगल्याला प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी हे नाव दिलं आहे. त्यामुळं नरुभाऊ कुठं आहेत? असं कोणी विचारल्यावर त्याचं उत्तर येतं, रायगडावर!
खा.प्रतापराव जाधव शिंदे गटात निघून जाईपर्यंत बुलडाणा जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख, म्हणजेच सर्वेसर्वा होते. जसे काँग्रेसमध्ये मुकुल वासनिक, राष्ट्रवादीत डॉ.राजेंद्र शिंगणे तसे शिवसेनेत प्रतापराव जाधव. त्यांचा सेनेत इतका दबदबा की, बुलडाणा जिल्ह्यातल्या विधानसभेसाठीचा ए.बी. फॉर्म ‘मातोश्री’वरुन न भेटता.. प्रतापरावांच्या मेहकरमधील बेडरुममध्ये मिळायचा. जिल्ह्यातली शिवसेनाच ‘होल वावर इज अवर’प्रमाणे प्रतापरावच चालवायचे. बुलडाण्यातून संजय गायकवाड व चिखलीतून नरेंद्र खेडेकर यांची शिवसेनेत ‘घरवापसी’ प्रतापरावांनीच करुन घेतली. त्यापैकी संजूभाऊ आमदार बनले, पण चिखली पुन्हा भाजपाकडेच गेल्याने नरुभाऊंचे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही. एकाचा ३५ वर्षाच्या संघर्ष फळाला आला, पण दुसऱ्याचा तो तसाच कायम राहिला. एकेकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून पहिल्या फळीत असणारे नरुभाऊ, मात्र पुढे प्रतापरावांच्या नेतृत्वात दुसऱ्या फळीतल्या सारखे सहसंपर्कप्रमुख म्हणून काम करु लागले._
पण राजकारणात कधी काय होईल? याचा नेम नसतो, शिंदे गटाने बंडखोरी केली.. अन् जिल्ह्यातील २ सेनेचे आमदार सुरत-गुवाहटीला निघून गेले. पुढे जेव्हा १२ खासदार शिंदे गटात गेले, त्यात प्रतापराव जाधव सर्वात पुढे होते. शिंदे गटाने बंडखोरी करताच, ‘निम का पत्ता कडवा है, एकनाथ शिंदे ….. ’ अशा घोषणा देवून रस्त्यावर पहिल्यांदा उतरले ते नरुभाऊ खेडेकरच. अगदी त्यांनी ‘गेली ती विष्ठा, राहिली ती निष्ठा..’ अशी जहरी टिकाही केली होती. त्यामुळे शिंदे गटातून विशेषत: आ.संजूभाऊंनी ‘२२ वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या खेडेकरांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये’ असा थेट समाचारच त्यांचा घेतला होता.
खा.प्रतापराव जाधव हे शिंदे गटात गेल्यावर तर नरुभाऊंमधला ‘टायगर’ पुन्हा खऱ्याअर्थाने ‘जिंदा’ झाला, अन् आतापर्यंत.. २०१९च्या निवडणुकीत रविकांत तुपकर वगळता, जे प्रतापगडावर हल्लाबोल करण्याचं धाडस कोणी दाखवलं नव्हतं ते नरुभाऊंनी दाखवलं. मेहकर विधानसभा मतदार संघात दिवंगत दिलीपराव रहाटे यांचे सुपुत्र आशिष रहाटे यांच्या रुपाने सुरु झालेल्या वादळाचा झंझावात केला तो, नरुभाऊंनी. मेहकर व लोणारच्या मेळाव्यात खेडेकरांनी थेट प्रतापरावांनाच लक्ष्य केले. म्हणजेच ज्यांच्या नेतृत्वात नरुभाऊ शिवसेनेत आले होते, तेच प्रतापराव हे शिंदे गटात गेल्यावर.. त्या नेतृत्वालाच आव्हान दिले ते नरुभाऊंनी!
प्रतापराव हे शिंदे गटात गेल्यावर त्यांना बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदावरुन निष्कासीत नव्हेतर.. त्यांची हकालपट्टीकरणारे पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने काढले होते. दुसऱ्याच दिवशी दिल्लीवरुन एकनाथ शिंदेंकरवी खा. प्रतापराव जाधव हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्वâप्रमुख बनले. त्यामुळे मूळ उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत रिक्त असणारे जिल्हा संपर्कप्रमुख पदाचे दावेदार बनले ते प्रा.नरेंद्र खेडेकर. शनिवार २७ जुलै रोजी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या उपस्थितीत प्रा.नरेंद्र खेडेकर यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली. यासह छगन मेहत्रे यांना सह संपर्कप्रमुख (बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा व मेहकर विधानसभा), उपजिल्हाप्रमुखांमध्ये प्रा.आशिष रहाटे (मेहकर विधानसभा), संजय हाडे (बुलढाणा विधानसभा), संजयसिंग जाधव (मलकापूर), अविनाश दळवी (खामगाव- शेगाव) तर विधानसभा संघटक म्हणून अशोक इंगळे (बुलढाणा विधानसभा), रवी महाले (खामगाव विधानसभा) यांची नियुक्ती करण्यात आली. तालुकाप्रमुख पदी निंबाजी पांडव (मेहकर), महेंद्र पाटील (सिं.राजा), संदीप मापारी (लोणार), ईश्वर पांडव (नांदुरा), दीपक पाटील (मलकापूर), विजय बोदडे (खामगाव) तसेच शहर प्रमुख म्हणून किशोर गारोळे (मेहकर), गजानन जाधव (लोणार), हेमंत खेडेकर (बुलढाणा), विठ्ठल जगदाळे (मलकापूर) रमेश ताडे (जळगाव जामोद) शुभम घाटे (संग्रामपूर), विजय इंगळे (खामगाव), योगेश पल्हाडे (शेगाव) यांची नियुक्ती करण्यात आली. यांच्या नियुक्त्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून जाहीर करण्यात आल्यात. या नियुक्त्या जाहीर होताच शिंदे गटानेही त्यांच्या मुंबईतून एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन जाहीर केल्यात. त्यात प्रामुख्याने जिल्हाप्रमुख म्हणून ओमसिंग राजपूत, शांताराम दाणे व बळीराम मापारी यांची नियुक्ती करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, मोताळा तालुकाप्रमुख रामदास चौथनकर, बुलडाणा शहरप्रमुख गजेंद्र दांदडे तर मोताळा शहरप्रमुख सुरेश खर्चे यांची नियुक्ती जिल्हा संपर्कप्रमुख खा.प्रतापराव जाधव, आ.संजय गायकवाड, आ.संजय रायमुलकर माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या.
अर्थात शिवसेनेतील दोन्ही गटांकडून आता ‘नियुक्तीसत्र’ हे ‘नियुक्तीपत्र’ देवून सुरु झाले आहे. असे असतांना ‘लक्षवेधी’ ठरत आहे ते, शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील जिल्हा संपर्कप्रमुख असलेले खा.प्रतापराव जाधव व प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्यातील भावी थेट संघर्ष. लोकसभेसाठी प्रतापरावांचं प्रतिस्पर्धी म्हणून नरुभाऊंची गणना सोशल मिडीयातून प्रामुख्याने होवू लागली आहे. त्यामुळे या राजकीय संघर्षाला रुप आले आहे ते, प्रतापगड विरुध्द रायगड?
(श्री राजेंद्र काळे हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विदर्भ व नाशिक विभाग सल्लागार संदक आहेत. संपापर्क 9822593923)