मानवाने आजतागायत जी प्रगती केली आहे त्याचे बहुतांश श्रेय त्याच्या प्रयत्नाला द्यावे लागते. सुख-दुःख,ज्ञान-अज्ञान,श्रीमंत-गरीब यातील अंतर कमी करण्यात मनुष्याच्या श्रमाचा सिंहाचा वाटा राहिला आहे,हे मान्य करावे लागेल. जेव्हा जेव्हा समाजात दुःख,अज्ञान आणि गरिबी थैमान घालते तेव्हा तेव्हा लोक कल्याणकारी महात्म्यांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केलेला दिसून येतो. महाराष्ट्रातील संत याला अपवाद नाहीत. महाराष्ट्रातील संतांनी वेळोवेळी प्रयत्नवादाचा पुरस्कार करून दुःखमुक्त समाजनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. आळस हा माणसाचा कसा शत्रू आहे हे वेळोवेळी पटवून देऊन संतांनी माणसाला कामाला लावले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी ठिकठिकाणी आपल्या अभंगवाणीतून प्रयत्नवादाची पेरणी केलेली दिसून येते.एका ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात,
साधुनी बचनाग खाती तोळा तोळा | आणिकांते डोळा न पाहावे ||१||
साधुनी भुजंग दरितील हाती | आणिके कांपती देखोनियां ||२||
असाध्य ते साध्य करिता सायास| कारण अभ्यास तुका म्हणे||३||
सरावामुळे काही लोक बचनाग नावाचे जालीम विष तोळा तोळा खातात,ही कृती काहींना डोळ्याने पहावत नाही.सरावाने काही लोक साप हातामध्ये धरतात ते पाहूनच इतरलोक कापू लागतात.असाध्य वाटणारी गोष्टही कष्ट केल्याने साध्य होते.अशा यशामागचे कारण फक्त अभ्यास हेच आहे,असे तुकाराम महाराज म्हणतात.अभ्यासाच्या जोरावर मनुष्य अत्यंत विषारी,घातक, जीवघेण्या अशा गोष्टीवरही मात करू शकतो.यातून संत तुकाराम महाराजांनी प्रयत्नवादाचे माहात्म्य पटवून दिले आहे.
याच आशयाचे दर्शन बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील निष्काम कर्मयोगी संत शुकदासजी महाराजश्रींच्या ‘अनुभूति’ ग्रंथातील १८३ क्रमांकाच्या अभंगात घडून येते. महाराजश्री म्हणतात की,
हृदय ओतून,कामाला लागाल |तरच होईल काहीतरी
नका पाहू मागे,येथे थांबू नका | पाऊलेही टाका,पुढे पुढे
जरी परिस्थिती,आहे प्रतिकूल |तरी सुटतील,प्रश्न सर्व
शुकदास म्हणे,निष्ठेने धैर्याने |करा चिकाटीने,काम पूर्ण
कोणतेही काम करत असताना ते वरवर न करता हृदयातून,जीव ओतून केले तरच तुम्हाला काहीतरी मिळेल.हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत मागे पाहू नका,थांबूही नका तर सतत पुढे पुढे आपली पाउले टाकीत राहा.कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुमचे सर्व प्रश्न सुटतील.शुकदास महाराज म्हणतात,खरोखर तुम्हाला जर कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण करायचे असेल तर तुम्ही ते काम अतिशय निष्ठेने,धैर्याने व चिकाटीने केले तरच ते पूर्णत्वास जाईल.
म्हणजेच निष्ठा आणि धैर्याला चिकाटीची जोड असेल तर ते काम पूर्ण होईल असा आत्मविश्वास महाराजश्री व्यक्त करतात.महाराजश्रींनी जीवनातील यशाची गुरुकिल्ली सर्वसामान्यांनाही कळेल अशा अतिशय सोप्या भाषेत सांगितली आहे.आपले कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी कामातील सातत्य,निष्ठा,धैर्य आणि चिकाटीला हृदयाच्या साथीची जोड दिली आहे.महाराजश्रींनी येथे हमखास यश संपादन करण्याचा राजमार्ग दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.यश संपादन करण्यासाठी लागणाऱ्या गुणांचा अंतर्भाव संतांच्या साहित्यामध्ये असल्याने हे साहित्य कालातीत ठरण्यास मदत होते.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारातील प्रयत्नवादाचे दर्शन कर्मयोगी संत शुकदास महाराजश्रींच्या वरील अभंगात घडून येते.शुकदास महाराजश्रींच्या प्रत्यक्ष कृतीतून विवेकानंद आश्रमाच्या रूपाने मानवी जीवन समृद्ध करणारी कर्मशाळा सुरू झाली.आज या कर्मशाळेत शिक्षण,आरोग्य,अध्यात्म, विज्ञान,कृषी,गोसंवर्धन आणि पर्यावरण इत्यादी संदर्भातील लोककल्याणकारी प्रयोग अतिशय यशस्वीरित्या पूर्णत्वास जात आहेत.यातच महाराजश्रींच्या दूरदृष्टीविषयक विचारातील प्रयत्नवादाचे मूळ दडलेले आहे.हे लक्षात घ्यावे लागते.
(लेखक डॉ. ज्ञानेश्वर महादराव गाडे हे संत साहित्याचे अभ्यासक व लाेकप्रिय व्याख्याते असून, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक आहेत. विवेकानंद नगर मो.नं ९९२३१६४३९३)