‘बाप्पा’ला घरी नेण्यासाठी मुस्लीम रिक्षाचालकाची मोफत सेवा!
– दरवर्षी इरफान किल्लेदार खिशाला झळ सोसून देतात मोफत सेवा
कोल्हापूर (दिलीप प्रभावळे) – कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि दणक्यात श्री गणरायाचे आगमन झाले आहे. या आगमाननिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हिंदू-मुस्लीम सदभावनेचे अनोखे नाते दिसून आले. वडणगे, वेताळ गल्ली येथील सर्व सामान्य मुस्लीम कुटुंबातील रिक्षाचालक इरफान किल्लेदार यांनी बुधवारी दिवसभरात तब्बल ६३ गणेशभक्तांची गणेशमूर्ती आपल्या रिक्षातून मोफत घरपोच सेवा देत पोहोचवली आणि आपला भक्तीचावाटा उचलला. विशेष म्हणजे, पेट्रोलचे भाव प्रचंड वाढलेले असताना, स्वतःच्या खिशाला झळ सोसून त्यांनी बाप्पांना भक्तांच्या घरी पोहोचवले आहे.
इरफान किल्लेदार हे गेली पाच वर्षे आपल्या रिक्षातून गणेशभक्तांना ही मोफत गणपती घरपोच सेवा देत आहेत. यंदाच्या वर्षीही त्यांनी सोसायटी हॉल, साखळकर गल्ली, भगवा चौक येथून जाधव मळा, इंदिरा नगर, माळवाडी, निगवे येथील गणेशभक्तांना ही सेवा दिली. केवळ आपण या समाजाचे काहीना काही देणं लागतो, हा एकमेव उद्देश ठेवून, आपल्या जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाज सेवेचा वसा, हा गणपती श्रद्धेपोटी आपण ही सेवा देत असल्याचे इरफान किल्लेदार यांच्याकडून सांगण्यात आले. या सेवेतून मिळत असलेल्या प्रेरणेतून मी हे कार्य करीत आहे. हे कार्य करीत असताना अशावेळी भाविकांचा आनंद, लहान मुलांची हौस-आनंद पाहण्यासारखा असतो. वडिलांसमान व्यक्तींचा आशीर्वादही या सेवेमुळे लाखमोलाचा मिळतो. यातच मी समाधानी असल्याचे इरफान शेवटी सांगायला विसरत नाहीत. यापुढे ही सातत्याने ही मोफत सेवा देण्याचे व्रत कायम ठेवणार असल्याचे इरफान किल्लेदार यांनी सांगितले आहे.