नंदूरबार (आफताब खान) – गणेशोत्सव तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहादा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी चक्क २ पोलिस गाड्यांना ३-३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या जिल्ह्यात हा पहिला प्रयोग केला आहे. त्यामुळे ह्या सीसीटीव्ही पोलीस गाड्या चर्चेचा विषय ठरत आहे.
जिल्ह्यात शहादा येथे ४ टप्प्यात विसर्जन मिरवणुका निघत असतात. शिवाय, विसर्जनाच्या मार्गदेखील मुख्य रस्त्याने जात असल्याने दरवर्षी पोलिसांची मोठी दमछाक होते. जिल्ह्यातून सर्वात जास्त पोलिस बंदोबस्त शहाद्यात लावावा लागतो हा सारा प्रकार बघता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवाय गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस गाड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. गणेशोत्सवा व्यतिरिक्त या दोन्ही पोलीस गाड्या शहरात गस्त करतील, त्यावेळी सीसीटीव्ही फायदेशीर ठरणार आहेत.
गणेश उत्सवात विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मिरवणूकांसह इतर हालचालींवर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून निरीक्षण केले जाणार आहे. विनाकारण गर्दीतून वाद निर्माण करणाऱ्या वर चांगलाच वचक बसणार आहे. ११ दिवस प्रत्येक मंडळाचे चित्रीकरण होण्यास मदत राहील. एकंदरीत गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी हा चांगला प्रयोग असून या सीसीटीव्ही माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक हे शहादा येथील पोलिस बंदोबस्त बघू शकतील. उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पोलीस स्टेशनला देखील तंत्रज्ञानाचा वापर करून संपर्क जोडण्यात आलेला आहे. गणेशोत्सवात तसेच विसर्जन मिरवणूक वेळी गर्दीच्या ठिकाणी महिलांनी अधिक काळजी घ्यावी. शक्यतोवर या काळात सोन्याचे दागिने परिधान करू नयेत अथवा त्यांची काळजी घ्यावी. शहरातील नागरिकांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश भक्तांनी कायद्याचे व नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेने साजरा करावा. कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास आपण पोलिसांची संपर्क साधावा असे आहवान पोलीस प्रशासनाने केले आहे.