– चारचाकी वाहने सामान्य ग्राहकांच्या आवाक्यापलिकडे!
पुणे (वाणिज्य प्रतिनिधी) – इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार अद्याप थंडच असून, भारतीयांनी या वाहनांना अद्याप पसंती दिली नाही. कमकुवत दर्जा आणि गुणवत्तेबाबत भारतीयांना संशय आहे. तसेच, बहुतांश छोट्या कंपन्यांनी चीनकडून वाहने बोलावून त्याला भारतीय लेबल लावत विकण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाही फटका वाहनांच्या विक्रीला बसत आहे. तसेच, चारचाकी वाहने तर सामान्यांच्या आवाक्यापलिकडे आहेत.
मर्सिडिज या बहुराष्ट्रीय कंपनीने आपली चारचाकी इलेक्ट्रिक गाडी बाजारपेठेत आणण्याची तयारी चालवली आहे. पॉवरफुल एएमजी व्हर्जनमधील ही ईक्यू सेदान गाडी असून, तिची किंमत तब्बल २.४५ कोटी इतकी आहे. तर ओला कंपनीच्या गाड्याही ४० ते ५० लाखांच्या दरम्यान आहे. दुसरीकडे, राज्य सरकारच्या कडक धोरणामुळे दुचाकी वाहनांचा बाजार प्रचंड मंदावला आहे. परिवहन आयुक्तांनी नियमांवर बोट ठेवल्याने, जादा स्पीडच्या गाड्या कमी स्पीडमध्ये दाखवून विक्री करण्याला ब्रेक लागला आहे. तसेच, दुचाकीच्या दर्जा व गुणवत्तेबाबत प्रचंड तक्रारी येत असल्याने, ग्राहकांनी दुचाकी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. लवकरच होंडा, बजाज, टीव्हीएस या कंपन्यांच्या ब्रॅण्डेड इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात येत आहेत. त्या खरेदीसाठी ग्राहकांनी वेटिंग लावली आहे.
————