समृद्धी महामार्गाचा प्रवास ठरणार सर्वात महागडा!
– कार प्रवासाकरिता प्रतिकिलोमीटरसाठी मोजावे लागणार तब्बल १.७३ रुपये
नागपूर (विशेष प्रतिनिधी) – बहुचर्चित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्गावरून प्रवास करणे सर्वसामान्यांसाठी चांगलेच महागडे ठरणार आहे. कारण, या द्रूतगती महामार्गावरून स्वतःच्या कारने प्रवास करण्यासाठी प्रतिकिलोमीटर एक रुपया ७३ पैसे इतका टोल भरावा लागणार आहे. म्हणजे, मुंबईहून नागपूरला जायाचे असेल तर ७०१ किलोमीटरकरिता १२०० रुपये इतका घसघशीत टोल भरावा लागणार आहे. या महामार्गावरून वेगाने प्रवास करणे शक्य असले तरी, वाढते इंधन दर आणि महागडा टोल पाहाता, सर्वसामान्य वाहनधारकांसाठी हा प्रवास महागडे स्वप्न ठरणार आहे.
समृद्धी महामार्गाचे लवकरच उद््घाटन प्रस्तावित आहे. तत्पूर्वी, या महामार्गावरील टोलचा मुद्दा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर काहींनी या टोलच्या नामफलकाचा फोटोच शेअर केला आहे. या फोटोमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. टोलचे हे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्थात पुढील जवळपास तीन वर्षांसाठी लागू असतील, असेही या फलकावर नमूद करण्यात आले आहे. फलकावर नमूद केलेल्या दरांनुसार, साध्या चारचाकी वाहनांसाठी, अर्थात कारसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोलची वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणार्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे. वाहन प्रकार आणि त्यासाठीचा टोल पुढीलप्रमाणे नमूद आहे, मोटर, जीप, व्हॅन अथवा हलकी मोटर वाहने – १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर, हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस – २.७९ रुपये प्रतिकिलोमीटर, बस अथवा ट्रक – ५.८५ रुपये प्रतिकिलोमीटर, तीन आसांची व्यावसायिक वाहने – ६.३८ रुपये प्रतिकिलोमीटर, अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने – ९.१८ रुपये प्रतिकिलोमीटर, अतिअवजड वाहने (सात किंवा जास्त आसांची) – ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर, याप्रमाणे टोल दर आकारला जाणार आहे.
आधी या महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर त्याच्या नामकरणामुळे हा महामार्ग कायम चर्चेत राहिला. मात्र, त्याच्या उद्धाटनानंतर मुंबई ते नागपूर हे ७०१ किलोमीटरचे अंतर वेगाने पार करता येणार आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या द्रूतगती मार्गाचे नामकरण करण्यात आले आहे.