पत्रा बाहेर आलेल्या बसने दोघांचे हात तोडले, एकजण गंभीर जखमी
– संतप्त जमावाचा मलकापूर आगारात राडा, आगारप्रमुख थोडक्यात बचावले
– अग्निवीर भरतीची तयारी करणार्या तरुणाचे एसटीने स्वप्नच छाटले
मलकापूर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार गाडीने आज सकाळी दोघांचे हात छाटले तर अन्य एकाला गंभीर जखमी केले आहे. मलकापूर येथे आज सकाळी सहा वाजता हा थरारक प्रकार घडला. गाडीचा पत्रा बाहेर आला असतानादेखील चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून तिघांना गंभीर जखमी केले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ज्यांचे हात तुटले आहेत, त्यात एक जण ४५ वर्षीय शेतकरी तर दुसरा २२ वर्षीय तरुण आहेत. हा तरुण पोलिस व अग्निवीर भरतीची तयारी करत होता. आता त्याच्या स्वप्नाच्या चिंधड्या एसटी महामंडळाने उडविल्या आहेत. या घटनेने संतप्त झालेले तरुण व ग्रामस्थ मलकापूर आगारात आगारप्रमुखांना जाब विचारण्यास गेले असता, पाहता पाहता जमाव उग्र झाला व त्यांनी आगारात तोडफोड सुरु केली. या घटनेत आगारप्रमुख थोडक्यात बचावले आहेत. मलकापूर आगाराला पोलिस बंदोबस्त देण्यात आला असून, शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. शेतकरी आणि युवक दोघांची प्रकृती गंभीर आहे.
सविस्तर असे, की मलकापूरवरून पिंपळगाव देवीकडे जाणार्या या बसने आज सकाळी ६ वाजता आव्हा गावाजवळ तीन जणांना गंभीर जखमी केले. ज्या शेतकर्याचा हात कटला तो ४५ वर्षीय असून, त्यांचे नाव परमेश्वर सुरडकर असे आहे. त्यांना तातडीने मलकापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तर या बसच्या पत्र्याने पोलीस व अग्निवीर भरतीची प्रॅक्टिस करणार्या दोन युवकांनांही जखमी केले. त्यात विकास गजानन पांडे (२२ वर्ष) याचा समावेश आहे. त्याचाही हात कटून वेगळा झाला आहे. विकास हा अग्निवीर भरतीची प्रॅक्टिस करत होता. त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे. सदर बस (एमएच ४० एन ९१२१) ही मलकापूर डेपोची आहे. तिचा चालक देवराव भावराव सूर्यवंशी आहे. दोघांच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी एसटी महामंडळाने घेतली आहे. सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून, बस चालक पोलीस स्थानकात आहे.
या घटनेची माहिती गावात समजली. त्यामुळे भंगार बस रस्त्यावर का आणली गेली याचा जाब विचारण्यासाठी जमाव मलकापूर आगारात गेला. तेथे जमावाने आगार प्रमुखावर जीवघेणा हल्ला केला. काहींनी आगार प्रमुखाच्या कक्षात जाऊन तोडफोड केली. यामुळे आगार प्रमुख दराडे हे भयभीत झाले. त्यांनी तेथून पळ काढला. तसेच ते डेपोमधील एका जागेत जाऊन लपले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बसस्थानकात धाव घेतली. या घटनेने मलकापूर बसस्थानकात एकच गोंधळ उडाला. सध्या घटनास्थळी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मलकापूर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
——————