– चिखली आगाराच्या गाड्या बंद असल्याने विद्यार्थ्यांची लूट
अंत्री कोळी, ता. चिखली (प्रतिनिधी) – चिखली आगाराच्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्याने, खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी जाणे-येणे करणार्या विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष गजानन वायाळ यांच्या कानावर टाकताच, त्यांनी विद्यार्थ्यांसह मेरा बुद्रूक ग्रामपंचायतीचे सदस्य सागर पडघान यांना घेऊन चिखली आगार गाठले. आगार व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर बंद करण्यात आलेली बुलढाणा-भुमराळा ही गाडी सुरु करण्यात आली आहे. त्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मेरा बुद्रूक व परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी चिखली येथे सवलतीच्या दराने पास काढून येणे जाणे करतात. बुलडाणा-भुमराळा ही एसटी बस विद्यार्थ्यांना सोयीची आहे. परंतु मागील तीन चार दिवसांपासून ही गाडी बंद असून, चिखली-साखरखेर्डा गाडीसुध्दा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे पास असूनसुद्धा विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने पन्नास रुपये खर्च करून जावे लागायचे. आज सकाळी काही पालकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष गजानन वायाळ यांची भेट घेऊन सदर बाब त्यांच्या कानावर टाकली. त्यामुळे आज पाच वाजता विद्यार्थ्यांना सोबत घेवून गजानन वायाळ व मेरा बुद्रूक ग्रामपंचायतीचे सदस्य सागर पडघान यांनी चिखली आगार व्यवस्थापक वाकोडे साहेब यांची भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आजच गाडी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली. या मागणीची तातडीने दखल घेत आगार व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आनंदी होवून विद्यार्थ्यांनी जल्लोष करत गजानन वायाळ यांचे आभार मानले.