धुळे (ब्युराे चीफ) – भल्या पहाटे तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला लुटणाऱ्या जळगांव येथील संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद करत, धुळे शहरातील त्याच्या नातेवाईक संशयितासदेखील ताब्यात घेतले आहे.
शहरालगत असलेल्या नकाणे गावातील देवेंद्र पाटील हा १८ मार्च रोजी शहरातील कृष्णाई हॉटेलजवळ बाहेरगावाहून येणाऱ्या नातेवाईकांना घेण्यासाठी मोटारसायकल घेऊन आला असता, पहाटे पाच वाजेच्या सुमारास मोटरसाकलवरून आलेल्या तीन अज्ञातांनी देवेंद्र पाटील याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खिशातील १ हजार ६०० रुपयांची रोकड काढून घेतले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगांव येथील गोपाल गोपी रावलकर याने हा गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तत्काळ पथकाला आदेश करत गोपाल यास ताब्यात घेत, विचारपूस केली असता, त्याने धुळे येथील चितोड रोड परिसरात राहणार त्याचा नातेवाईक शंकर रतन साळुंखे व सहील सुनील केदार यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. पथकाने तत्काळ शंकर साळुंखे यास ताब्यात घेतले तर सहिल केदार हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या दोघांवर धुळे शहर पोलिस ठाण्यासह उल्हासनगर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.