लातूर (गणेश मुंडे) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यात आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व सर्व बँक शाखा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात सर्व तालुक्यात बँक कर्ज वितरण मेळाव्याचे व आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले. या कर्ज मेळाव्यामध्ये लातूर जिल्हात उमेदच्या एकूण 385 बचत गटांना 7 कोटी 50 लाख एवढ्या विक्रिमी रक्कमेचे कर्ज वितरण करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी रेणापूर तालुक्यातील 52 बचत गटांना 1 कोटी 3 लाख रक्कमेचे कर्जाचे वितरण करण्यात आले. बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा विनियोग महिलांनी गावस्तवर विविध सामूहिक व वैयक्तिक व्यवसायासाठी करून आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करून स्वावलंबी बनावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित महिलांना केले.
यावेळी हर घर तिरंगा अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम विषयी व तिरंगा ध्वज लावताना घ्यावयाची काळजी याबाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गिरी यांनी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी केले मेळाव्यास जिल्हा व्यवस्थापक वैभव गुराळें हे उपस्थित होते. या बँक मेळाव्याचे यशस्वी नियोजन रेणापूर तालुका अभियान व्यवस्थपाक कल्पना लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुका व्यवस्थापक यांनी केले. या बँक मेळाव्यास गटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.