ChikhaliVidharbha

‘महावितरण’च्या भोंगळ कारभाराचा चिखली तहसील कार्यालयालाही फटका!

– ग्राहक त्रस्त, शेतकरी त्रस्त, आता चक्क तहसीलदारही त्रस्त!

चिखली (एकनाथ माळेकर) – मनमानी कारभार, ग्राहकांच्या समस्येकडे दुर्लक्ष, अवाजवी बिल व विद्युत चोरांचे खापर सर्वसाधारण ग्राहकांच्या डोक्यावर फोडण्यासाठी कुप्रसिद्ध असलेली निर्ढावलेली महावितरण कंपनी ही सध्या ग्राहकांना योग्य सेवा न देता, मनमानी कारभार करीत आहे. चिखली महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसाधारण ग्राहक तर त्रस्त होतेच, परंतु आता चक्क तालुक्याचे तहसील कार्यालय जे तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी समस्या सोडवितात, नागरिकांना न्याय देतात, त्यांच्याच तक्रारीला आता महावितरण केराची टोपली दाखवत, पोकळ आश्वासने देत झुलवत आहे. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनाही महावितरण जुमानत नसल्याने, महावितरणच्या या मोकाट बैलाला आता वेसण कोण घालणार, असा संतप्त सवाल ग्रामीण भागातून निर्माण होत आहे.

सविस्तर असे, की चिखली तहसील कार्यालय व्हरांड्यात ध्वज खांब व पार्किंग स्टँडच्या मध्यभागी तहसील कमानला लागून असलेला लोखंडी विद्युत खांब वाकल्याने तहसील कार्यालयात विद्युत वाहक तार दोन्ही बाजूने झुकल्या गेल्या आहेत. या विद्युत प्रवाहीत तार जमिनीपासून सात ते आठ फुटावर आलेली आहेत. तर एका बाजूने विद्युत तारावर वेली चढल्याने जीवितहानी किंवा भयंकर दुर्घटनेची शक्यता वाढली आहे. तहसीलदार अजितकुमार येळे यांनी संभाव्य परिस्थिती पाहता विद्युत महावितरण चिखली व बुलडाणा कार्यालयास रीतसर पत्र व्यवहार करून खांब बदलण्याचे व वेली व झुडपांच्या विळख्यात गुंतलेली विद्युत वाहक तार मोकळी करावे, असे पत्राद्वारे कळविले आहे.
याबाबत पंधरा दिवस होऊनही महावितरण कार्यालयाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसून, परत टपाली पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले की, तहसील कार्यालयाने स्वखर्चाने विद्युत पुरवठा करणारे लोखंडी खांब कंत्रादारांकडून बदलून घ्यावे, असे पत्र पाठवून महावितरण मोकळे झाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. दोन दिवसावर स्वातंत्र्यदिनाची मंगल पहाट उदयास येणार आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकाविला जाणार आहे, त्याच ठिकाणी तारे खाली लोमकळली आहेत.
तहसील कार्यालय व इतर ठिकाणी वाढलेली झाडी, झुडपे, वेली पाहून असे निदर्शनात येते की, दरवर्षी महावितरणकडून शहरातील विद्युत खांब व ताराला अडसर ठरणारी झाडी, झुडपे, फांद्या, वेली लाखो रुपये खर्च करून फक्त कागदोपत्रीच तोडली जातात का? आजपर्यंत महावितरण कंपनीमुळे सर्वसाधारण ग्राहक, शेतकरीच त्रस्त होते आता तर चक्क तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे कार्यालय महावितरणच्या रडारवर आल्याने स्वतः तहसील कार्यालय जर महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून त्रस्त असेल तर सर्वसाधारण ग्राहक व शेतकरी यांचे हाल न सांगणे बरे. विद्युत खांब सरळ करणे, खांबावरील इतर अडचणीचा निपटारा करणे, लोंबकळलेली तारे व्यवस्थित करणे, विद्युत प्रवाहला अडथळा निर्माण करणारी आवश्यक ती झाडे, फांद्या, झुडपे व वेली तोडणे हे महावितरण कंपनीचे कर्तव्य असतांना, अशाा निर्ढावलेल्या महावितरण कंपनी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य दंडात्मक कारवाई होईल का, येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला विद्युत तार, वाकलेला लोखंडी खांब व तारावर चढलेल्या वेलीची समस्येतून तहसील कार्यालयास स्वतंत्र मिळेल का? असा सवाल निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!