राज्यमार्ग, राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक खोळंबली; शेतकरी संकटात!
लातूर (गणेश मुंडे) – गेले दाेन दिवस विश्रांती दिलेल्या पावसाने गुरुवारी पुन्हा धाे धाे काेसळण्यास सुरुवात केली. काल सायंकाळच्या सुमारास शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने संबंध तालुक्यात हाहाकार उडाला असून शेतातील पिकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पिके खराब होत चालली आहे. त्यामुळे शासनाने विचार नकरता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे उदगीर शहरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले तर शहराच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उदगीर लातूर मार्गावरील नरसिंग वाडी पाटी येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे हा मार्ग काही काळ बंद करण्यात आला होता. पुलाच्या दुतर्फी वाहनाच्या मोठा प्रमाणात रांगा लागल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी सात वाजल्यापासून हा मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. उदगीर पुणे लातूर जाणारी वाहने ट्रॅव्हल्स पर्यायी देवर्जन व कुमठा, हेर, मार्गे वळविण्यात आली होती. तालुक्यात सर्वदूर मुसळधार पावसाने थैमान घातले होते. उदगीर शहराच्या मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काही दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून व्यापाराचे अतोनात नुकसान झाले आहे. नांदेड नाक्याजवळील वजन काटा शेजारी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
शेतकरी संकटात
अगोदरच गोगलगायचा हल्ल्यात पिके सापडली होती.त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचे दुसरे संकट ओढावले आहे. गोगलगायच्या हल्ल्यातून सावरत असताना, शेतातील सोयाबीन पिकात पाणी थांबल्याने अतोनात नुकसान झाले आहे, याचे त्वरित पंचनामे सुरू करून ओला दुष्काळ जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी चंद्रपाल शेळके यांनी केली आहे.
उदगीरहून देगलूरकडे जाणाऱ्या मार्गावरही धडकनाळ नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने अनेक तास वाहतूक खोळंबली होती. सर्वदूर मुसळधार पावसामुळे उदगीर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले व सर्वत्र हाहाकार उडाल्याची स्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे उदगीर ११६ (८०८), (७३७), हेर ६६ (६८२), वाढवणा २५ एकूण सरासरी पर्जन्य- ७२३.७२ मिलिमीटर इतकी आहे.