लव्हाळ्याच्या शेतकर्यांची जिल्हाधिकार्यांकडे धाव; भामट्या रणमोडेसह त्याच्या साथीदारांची संपत्ती जप्त करा, शेतकर्यांचे पैसे द्या!
– शेतमाल खरेदी फसवणूक प्रकरण : रणमोडे, साळवे, म्हस्के यांना जामीन देऊ नका! जामीन मिळाला तर ते पुन्हा पळून जातील!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्यासह देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मेहकर, लोणार, बुलडाणा या तालुक्यांतील शेकडो शेतकर्यांची शेतमाल खरेदीत फसवणूक करून, त्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणार्या संतोष बाबूराव रनमोडे याच्यासह त्याच्या साथीदारांनी लव्हाळा (ता. मेहकर) येथील शेतकर्यांनाही २१ लाख ६३ हजार रुपयांचा चुना लावून, शेतमाल घेऊन फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत साहेबराव आत्माराम लहाने यांच्यासह शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत, त्यांना निवेदन दिले असून, रणमोडे याच्यासह त्याचे साथीदार नीलेश साळवे, अशोक म्हस्के (रा. गांगलगाव, ता.चिखली) यांची संपत्ती जप्त करून आमचे पैसे देण्यात यावेत, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. तसेच, या भामट्यांना जामीन मिळू देऊ नका. त्यांना जामीन मिळाला तर ते पुन्हा पळून जातील, ही बाबही जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
साहेबराव आत्माराम लहाने (रा.लव्हाळा, ता. मेहकर) यांच्यासह तब्बल १६ शेतकर्यांनी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व त्यांना सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात नमूद आहे, की लव्हाळा येथील २२ शेतकरी यांची पवित्रा ट्रेडिंग कंपनीचा संचालक संतोष बाबूराव रणमोडे व नीलेश आत्माराम साळवे, अशोक समाधान म्हस्के, हे रा. गांगलगाल, ता. चिखली यांनी मौजे लव्हाळा येथे येवून २१ लाख ६३ हजार रुपयांचा शेतमाल खरेदी करून फसवणूक केली असून, या व्यक्तींवर चिखली पोलिस ठाण्यात १८ जून २०२२ रोजी भारतीय दंडविधानाच्या ४०६, ४०९, ४२०, ४२० (ब), आणि ३४ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत. परंतु, त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. त्यांना जामीन मिळाला तर हे आरोपी फरार होऊ शकतात. तरी, या प्रकरणात पोलिस तपासाला गती देण्याचे आदेश व्हावेत, व सदर आरोपींची संपत्ती जप्त करून, त्यांना राज्य व देशाबाहेर जाण्याची मूभा देण्यात येऊ नये व सदर शेतकर्यांची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी साहेबराव लहाने यांच्यासह १६ शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हे निवेदन पाेलिस अधीक्षकांकडे पाठवले असल्याचे कळते आहे.
भामट्या संतोष रणमोडे याच्यासह त्याच्या साथीदारांनी शेतकर्यांकडून जादादराने शेतमाल खरेदी केला, व त्यापोटी त्यांना कोरे धनादेश दिले. तसेच, काहींना जादा दर देण्याचे आमिष दाखवून उधारीत शेतमाल खरेदी केला. शेतमाल घेऊन हे भामटे पसार झाले होते. ज्या शेतकर्यांनी धनादेश घेतले होते, त्यांचे चेक बाऊन्स झाले. त्यामुळे मोठी आर्थिक फसवणूक झाल्याने शेतकरी हादरून गेले आहेत. याबाबत चिखली, अंढेरा पोलिस ठाण्यात रणमोडेसह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने फरार झालेल्या रणमोडेला उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सद्या या भामट्यासह त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत आहेत. परंतु, हे भामटे जामिनासाठी अर्ज करत आहेत. त्यांना जामीन मिळाला तर ते पुन्हा फरार होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा जिल्हा प्रशासन व पोलिसांनी या भामट्यांच्या जामीनअर्जाला न्यायालयात तीव्र विरोध करण्याची गरज आहे. दरम्यान, सोमवारी या आरोपींना न्यायालयापुढे हजर केले जाण्याची शक्यता आहे.