KARAJAT

कर्जत तालुक्यातील तीनही ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

– धनशक्तीचा जनशक्तीने केला पराभव – बापूराव शेळके

– सत्ताबदल हाेताच भाजपचे वारे फिरले,  आ. राेहित पवार यांना झटका

कर्जत (आशिष बाेरा) : कोरेगाव ग्राम पंचायत मध्ये जन शक्तीने धनशक्तीचा पराभव केला असून सर्वसामान्य नागरिकांनी विकास व त्या भोवती चाललेल्या दिखाव्याला जागा दाखवून देत वास्तव समोर आणले असून, या माध्यमातून परिवर्तना चे वारे वाहू लागणार असल्याचे मत माजी सरपंच बापूराव शेळके यांनी कोरेगाव ग्रामपंचायतीच्या यशा नंतर व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील तिन ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले असून भाजपाचे माजीमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांना झटका दिला असल्याची राजकीय चर्चा होत आहे.  कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गटालाच प्रतिस्पर्धी माजी सरपंच बापूराव शेळके गटाकडून पराभव स्वीकारावा लागला असून, राज्यात सत्तांतर होताच कर्जत तालुक्यात परिवर्तनाचे वारे या निवडणुकीपासून सुरू झाले असल्याची चर्चा भाजपा कार्यकर्ते करू लागले आहेत.

कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम झाला होता.  यापैकी कुळधरण ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास पदाधिकाऱ्यांना यश आले होते. यामध्ये भाजपाने ७ तर राष्ट्रवादीने ६ सदस्य बिनविरोध केले.  या सोबत गुरुवार दि ४ रोजी उर्वरीत कोरेगाव आणि बजरंगवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. शुक्रवार, दि ५ रोजी सकाळी १० वाजता कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये १३ जागेपैकी ७ जागेवर माजी सरपंच भाजपाचे बापूराव शेळके व माजी सभापती पुष्पा शेळके यांच्या नेतृत्वाखालील गटाने ७ जागा जिंकून पारंपरिक विरोधक फाळके गटाला आस्मान दाखवले, राष्ट्रवादीच्या फाळके गटाला ६ जागावर समाधान मानावे लागले.  कर्जत तालुक्यातील कोरेगाव ही महत्वाची ग्रामपंचायत असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे हे गाव आहे, तर पंचायत समितीच्या सभापती मनीषा जाधव यांचेही गाव आहे. या निवडणुकीत दिलीप जाधव यांना अवघ्या 4 मताने निसटता विजय मिळवलं तर जयवंत शिवाजीराव फाळके यांनी दोन जागेवर निवडणूक लढवली होती यातील एका जागेवर विजय मिळाला तर एका जागेवर पराभव स्वीकारावा लागला.  कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या ग्राम पंचायती मध्ये बापूराव शेळके यांनी विजयश्री खेचून आणत भाजपात आपली ताकद वाढवली असून गेली अडीच वर्षाच्या काळात अनेक जण भाजपला सोडत असताना त्यांनी भाजपाचा किल्ला लढवल्याने आगामी काळात तालुक्यात त्याचे वजन वाढणार आहे.  या विजयानंतर सर्वानी कर्जत शहरातून विजयी मिरवणूक काढली. भाजपा पक्ष कार्यालया पुढे सर्वाचा सत्कार करण्यात आला.

कोरेगाव ग्राम पंचायत मधील विजयी उमेदवार व त्याना पडलेली मते पुढीलप्रमाणे : ताई दादासाहेब कोळेकर (३९९), श्रीकांत निवृत्ती वाघ (३४३), शशिकला हनुमान शेळके (४१६), सुषमा विजय पाचपुते (४७३), अंजली विनोद मुरकुटे (५००), रोहिदास विठ्ठल अडसूळ (५१४), मालन शिवाजी मुरकुटे (५२१), जयवंत शिवाजीराव फाळके (६४६), दिलीप राजाराम जाधव (३९०), जयश्री गंगासिंग परदेशी (५८३), बदामबाई भद्रीसिंग परदेशी (५८१), अनिल कुंडलिक शेळके (४८२), मुरलीधर काशिनाथ मुळीक (५०९). यासह बजरंगवाडी ग्रामपंचायतीमध्ये देखील भाजपाने ७ पैकी ५ जागा मिळवत आपली सत्ता काबीज केली. तर विरोधी गटाला अवघ्या २ च जागेवर समाधान मानावे लागले.
बजरंगवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या अंगद रुपनर यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला तर भाजपाच्या पॅनल ने येथे बहुमत मिळवले विजयी उमेदवार आणि त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे : संजय काळे (५१), सीमा अंगद रुपनर (६१), दिगंबर रूपनर (२१७), अनिता सोन्याबाप्पू बजंगे (२१२), सुदामती कांतीलाल रूपनर (२००), बाबासाहेब काळे (१४६) तर विजया दादा गोयकर (१४०) यांचा विजय झाला आहे.  कर्जत मधील भाजपाच्या संपर्क कार्यालयात विजयी उमेदवारांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.  यावेळी समर्थकांनी मोठा जल्लोष करीत गुलालाची उधळण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!