LATUR

75 दिवसांत जिल्ह्यातील सर्व कार्यालये, शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करा!

– तंबाखूजन्य पदार्थ या दानपेटीत टाकूनच कार्यालयात प्रवेश करावा लागणार

– कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार संस्था प्रमुखामार्फत दोनशे रुपये दंड आकारला जाणार

लातूर (गणेश मुंडे) – तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे वाढते प्रमाण व त्याचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता,  राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थावर निर्बंध घातलेले आहेत.  त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकिय, खाजगी कार्यालये सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये तसेच खाजगी शिकवणी वर्ग इत्यादी तंबाखूमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले. या निर्बंधामुळे सर्व जिल्ह्यातील कार्यालये आणि शैक्षणिक संस्था ह्या तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यामुळे कार्यालयीन परीसर विद्रुप होतो तसेच थुंकिद्वारे पसरणारे संसर्गजन्य रोगावर आळा आणता येऊ शकतो. सर्वांनी या सुचनांचे काटेकोर पालन करावे असेही आवाहन जिल्ह्याधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात येथे आयोजित करण्यात आली होती.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस उपअधिक्षक अनुराग जैन, जिल्हा शल्य चिकित्सक, डाॕ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॕ.सतिष हरिदास, जिल्हा शिक्षण अधिकारी श्री व्ही. व्ही दशवंत, वैद्यकीय अधिकारी मनपा, डॉ. माले, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे व सर्व तालुक्यातील गटशिक्षणअधिकारी यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड परीसरात धुम्रपान तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे अथवा विक्री करणे कोटपा २००३ कायद्यानुसार प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. सर्व कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक पेटी ठेवावी. कार्यालयात प्रवेश करण्याच्या आधी सर्व प्रकारचे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ या दान पेटीत टाकूनच कार्यालयात प्रवेश करावा लागणार आहे. कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार संस्था प्रमुखामार्फत दोनशे रुपये दंड आकारला जाऊ शकतो. सर्व कार्यालय प्रमुखांनी आपले कार्यालय व परिसरात कोणत्याही प्रकारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि यांनी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेचे निकष पुर्ण करुन ७५ दिवसात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!