– जिल्हा परिषदेत आता किमान ५० तर कमाल ७५ सदस्य संख्या
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीबाबत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे. एकूणच २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. या निर्णयाची अधिकृत माहिती अद्याप मुख्यमंत्र्यांनी दिली नव्हती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ आणि जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील. या संदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून देशात जनगणना झालेली नाही. त्यामुळे नवी वॉर्ड रचना ही चुकीची झाली आहे, असा आक्षेप आधीच भाजपकडून घेण्यात आला होता. तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने नऊ प्रभाग वाढवले होते. त्यावर शिवसेनेने त्यांच्या फायद्यानुसार वॉर्ड रचना केल्याचा आरोपही भाजपने केला होता. त्यामुळे आजच्या या निर्णयांवर भाजपचा वरचष्मा दिसत आहे.
Leave a Reply