शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासला; 10 हजाराची लाच घेतांना त्याला एसीबीने रंगेहाथ पकडला!
बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – शिक्षक म्हणजे शिक्षण-क्षमता-कर्तव्याचा त्रिवेणी संगम आहे. हे शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र काम करतात, पालक आपल्या मुलांना शिक्षकांच्या भरवश्यावर शाळेत पाठवितात. परंतु आता शिक्षणात सुध्दा भ्रष्टाचार सुरु झाला आहे. बुलडाणा येथे पगारापेक्षा जास्त पैश्याच्या अपक्षेसाठी एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासत विद्यार्थ्यांला इयत्ता अकरावी प्रवेश देण्यासाठी 10 हजार रुपये लाच स्वीकारल्याने त्या शिक्षकाला बुलडाणा लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडून गजाआड केले आहे. सदर कारवाई आज 3 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे करण्यात आली. लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव प्रल्हाद गायकवाड असून यामध्ये त्याच्या तीन साथीदारांनाही पकडण्यात आले आहे.
अंशतः अनुदानित यादीनुसार भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुलडाणा येथे मुलाला 11वीत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्यावतीने वसतीगृह कार्यवाहक गजानन मोरे या महाशयाने 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी बुलडाणा लाचलूचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने 28 जुलै रोजी लाचलूचपत विभागाने पडताळणी केली. आज बुधवार 3 ऑगस्ट रोजी लाचलूचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून लव ट्रस्ट फोर इंडियन चिल्ड्रन इन नीड संस्थेच्या खाजगी कर्मचारी राहुल जाधव रा.देऊळघाट याने लाचखोर मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्यावतीने तडजोडी अंती 10 हजार रुपये स्वीकारतांना त्याला लाचलूचपत विभागाने ताब्यात घेतले. लाचखोर मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड याला साथ देणाऱ्या त्याचे साथीदार गजानन सुखदेव मोरे वसतीगृह कार्यवाहक दि युथ लीग रिक्रिएशन सेंटर बुलडाणा रा. बिरसिंगपूर, जितेंद्र प्रल्हाद हिवाळे मजूर दि युथ लीग रिक्रिएशन सेंटर रा. नांद्राकोळी ता.बुलडाणा, राहुल विष्णू जाधव लेखापाल लव ट्रस्ट फोर इंडियन चिल्ड्रन इन नीड, खामगाव रोड, बुलडाणा रा. देऊळघाट, ता.बुलडाणा यांना एसीबीने अटक केली आहे. बुलडाणा येथील वावरे ले-आऊट येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकाने लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती. सदर कारवाई बुलडाणा एसीबीचे उपअधिक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सचिन इंगळे, पीएसआय भांगे, पेाहेकाँ.विलास साखरे, राजू क्षिरसागर, मो.रिजवान व त्यांच्या सहकार्यांनी आज सायंकाळच्या दरम्यान केली.
विद्यार्थ्यांनी कोणाचा आदर्श घ्यावा..
महसूल विभाग लाच घेण्यात जवळपास एक नंबरवर असतात. परंतु बुलडाणा येथे शैक्षणीक क्षेत्रात शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लाचेची मागणी करुन ती स्वीकारली.. ही घटना मनाला पटणारी नाही. परंतु भारत विद्यालयातील लाचखोर मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांना लाच स्वीकारतांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडल्याने शिक्षकांची प्रतिमा डागळल्या गेली असल्याने विद्यार्थ्यांनी कोणाचा आदर्श घ्यावा, असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केल्या जात आहे.