उमेदवारीअभावी अनेकजण लटकले; उद्यापासून अर्ज भरण्यास सुरूवात!
- ४ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची तारीख
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – महाआघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांची यादीच अद्याप जाहीर झालेली नाही. तसेच, महायुतीनेदेखील अनेकांना वेटिंगवर ठेवले आहे. त्यामुळे अनेक इच्छूक उमेदवारांची धाकधूक वाढली असतानाच, उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. अर्ज भरण्याची तारीख २२ ऑक्टोबरपासून असून, अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधासभा निवडणुकीचा कार्यक्रम १५ ऑक्टोंबर रोजी जाहीर केला. त्या अनुषंगाने सिंदखेडराजा २४ विधासभा मतदारसंघामध्ये उद्यापासून निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. विधासभचे वेळापत्रकानुसार २२ ऑक्टोबर २०२४ पासून अधिसूचना जारी होत असून, २९ ऑक्टोंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख व ३० ऑक्टोंबराला आलेल्या अर्जाची छाननी होणार आहे. तर ४ नोव्हेंबर ही अर्ज माघार घेण्याची मुदत असून, त्याच दिवशी उमेदवारांना निवडून चिन्ह वाटप करण्यात येईल. २० नोव्हेंबर २०२४ ला मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक उमेदवारांसाठी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये तहसील कार्यालय येथे उपलब्ध होणार असून, त्याच दालनामध्ये अर्ज स्वीकृती होणार आहे. अर्ज स्वीकृतीसाठी उमेदवारासोबत पाच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी सांगितले.