उद्याच कळणार शेतकरी नेते रविकांत तुपकरांची भूमिका?
- बुलढाण्यात बोलावली तातडीची बैठक; तुपकरांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!
– राज्यातील पदाधिकार्यांचीही उद्याच स्वतंत्र बैठक होणार!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याच्या शेतकरी चळवळीतील प्रमुख चेहरा म्हणून राज्यभर ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे येणार्या विधानसभेचे अनुषंगाने आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. यासाठी त्यांनी राज्य व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि समर्थकांची तातडीची बैठक बोलावली आहे. बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील गोलांडे लॉन्स येथे उद्या (दि.२२) सकाळी १०.०० वा. या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत रविकांत तुपकर कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष करून, महाआघाडीच्या नेत्यांचे या बैठकीकडे विशेष लक्ष असणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच पक्ष आणि संघटनांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. रविकांत तुपकर यांनीदेखील राज्यातील काही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय यापूर्वीच पुणे येथील बैठकीत जाहीर केला होता. त्या अनुषंगाने तुपकरांनी राज्यात विविध ठिकाणी मेळावेदेखील घेतले. दरम्यान, रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावे, यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत. गेल्या आठवड्यात रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दोन बैठका झाल्याचे वृत्त समोर आले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीदेखील तुपकरांची चर्चा झाली होती तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशीदेखील तुपकरांची एका भेटीत आघाडीत सहभागी होणे बाबत सविस्तर चर्चा झाली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघासह आणखी काही जागांबाबत रविकांत तुपकर आग्रही असल्याचे समजते. यासंदर्भात त्यांची महाविकास आघाडीशी चर्चा चालू आहे. त्यामुळे रविकांत तुपकर महाविकास आघाडीत सहभागी होतील की काही वेगळा निर्णय घेतात, अशीदेखील चर्चा आहे.
दरम्यान, आता रविकांत तुपकर यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकारी व जिल्ह्यातील पदाधिकार्यांची व समर्थकांची दि. २२ ऑक्टोबररोजी गोलांडे लॉन्स येथे सकाळी १०.०० वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात पुढील दिशा ठरवून महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्यासाठी व चळवळीची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. तुपकर या बैठकीत काय निर्णय घेतात आणि कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे आता बुलढाणा जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे, त्यामुळे ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यातील पदाधिकार्यांचीही बोलावली बैठक!
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय निर्णय घेण्यासाठी रविकांत तुपकर यांनी राज्यातील पदाधिकार्यांचीदेखील बैठक बोलावली आहे. राज्यातील पदाधिकार्यांची स्वतंत्र बैठक सकाळी ९.०० वा. पार पडणार असून, या बैठकीत राजकीय भूमिका व चळवळीची पुढील दिशा यावर सविस्तर चर्चा होणार आहे. राज्य पातळीवर पदाधिकार्यांची मते जाणून घेवून निर्णय घेणार आहेत. या बैठकीनंतर तुपकर नेमकी कोणती राजकीय भूमिका आणि कोणता निर्णय जाहीर करतात, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.