ChikhaliVidharbha

वैद्यकीय व अर्जंटचे दाखले तातडीने देणार; चिखली महसूल प्रशासनाची ग्वाही!

– आंदोलक व शेतकरी नेत्यांशी नायब तहसीलदारांची चर्चा; दाखले देण्याचे आश्वासन

चिखली (तालुका प्रतिनिधी) – महसूल कर्मचार्‍यांच्या संपामुळे शेतकरी, विद्यार्थी, तसेच महिला लाभार्थ्यांचे विविध दाखले अडकले आहेत. याबाबत शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आवाज उठविल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शिवसेना तालुकाप्रमुख व स्थानिक नेते व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिखली तहसीलसमोर आंदोलन केले. तसेच, नायब तहसीदारांशी चर्चा केली. यावेळी वैद्यकीय व अर्जंटचे दाखले तातडीने देण्यात येतील, अशी ग्वाही चिखली तहसीलचे नायब तहसीलदार मुंडे यांनी दिली आहे.

महसूल कर्मचारी संपावर असल्याने विद्यार्थ्यांचे, शेतकरी व लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पुढे आलेल्या महिलांचे विविध दाखले तहसील कार्यालयात अडकून पडलेले आहेत. याबाबत शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आवाज उठवला होता. तसेच, हे दाखले देण्यासाठी महसूल अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित करताच, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी महिला, विद्यार्थी व शेतकरीप्रश्नी चिखली तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यात शिवसेना तालुकाप्रमुख कपील खेडेकर, नंदू कराडे यांच्यासह विष्णू मुरकुटे, अशोक सुरडकर, रवी पेटकर, श्रीराम झोरे, संतोष वाकडे यांच्यासह शेतकरी नेते विनायक सरनाईक व सुधाकर तायडे, गजानन सोळंकी, गजानन पंडित, तानाजी चिकणे, अनिल चौहान, सुधाकर शेळके आदींचा सहभाग होता. या आंदोलनाची दखल घेत, नायब तहसीलदार मुंडे यांनी आंदोलकांना चर्चेला बोलावले. त्यावर कपील खेडेकर, विनायक सरनाईक यांनी भूमिका मांडली असता, तहसीलदारांनी अर्जटचे दाखले तातडीने देण्याची ग्वाही देत, तशी प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, महसूल कर्मचार्‍यांच्या आंदोलनप्रश्नी राज्य सरकारने २३ तारखेला बैठक बोलावली असून, या बैठकीत कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
————

महसूल कर्मचारी संपावर; विद्यार्थ्यांचे दाखले अडकले; शेतकरी, ‘लाडक्या बहिणी’ही लटकल्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!