BuldanaBULDHANAChikhaliHead linesVidharbha

महसूल कर्मचारी संपावर; विद्यार्थ्यांचे दाखले अडकले; शेतकरी, ‘लाडक्या बहिणी’ही लटकल्या!

– कर्मचारी संपावर असतील तर अधिकार्‍यांनी दाखले द्यावेत – विनायक सरनाईक

चिखली (महेंद्र हिवाळे) – गेल्या दोन ते चार दिवसांपासून महसूल कर्मचारी यांनी बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची महसूलविषयक कामे तर खोळंबलीच, परंतु विद्यार्थी, व नोकरीसाठी लागणारे महत्वाचे दाखले, या संपामुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, यांच्यासह लाडक्या बहिणीचेही दाखले अडकल्याने महसूल प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झालेली आहे. हे कर्मचारी संपावर आहेत, तिथपर्यत ठीक आहे. परंतु अधिकारी तर संपावर नाहीत ना? असा सवाल करत, शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी अधिकार्‍यांनी परिस्थिती हातात घेऊन तातडीने गरजुंना दाखले वितरीत करावेत, अशी मागणी केली आहे.
advt.

राज्यातील शिंदे सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यानंतर कर्मचारी, अधिकारी यांची विविध प्रकारचे ऑनलाईन दाखले काढण्यासाठी दमछाक झाली आणि कधी नव्हे ती गर्दी तहसील कार्यालय व महा-ई-सेवा केंद्रामध्ये झाल्याचे दिसून आले. या योजनेसाठी जास्तीचे कागदपत्रे लागणार नाही हे जरी शासनाने जाहीर केले असले तरी याबाबत सर्वसामान्य जनता मात्र जाणून नाही, आणि या योजनेच्या लाभासाठी लागणारे दाखलेही मिळण्यास आता अडचणी येत आहेत. त्यातच आता महसूल कर्मचारी यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे चिखली तालुक्यात अनेकांचे उत्पन्न, नॉन क्रिमीलीयर, शेतकरी प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र आदी दाखले मिळणे मुश्कील झाले असून, हे दाखले अडकून पडलेले आहेत. त्यातच तलाठी यांनीसुद्धा आंदोलन पुकारले असल्याने अनेक अडचणींचा सामनादेखील नागरिकांना करावा लागणार असल्याने या अडकलेल्या दाखल्यांचे काम कर्मचारीऐवजी अधिकारी यांनी हाती घ्यावे व विद्यार्थी व जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे. तर दाखले निकाली न निघाल्यास विद्यार्थी व पालकांसमवेत आंदोलन छेडण्याचा इशाराही सरनाईक यांनी दिला आहे.
कर्मचारी व तलाठी यांचे प्रश्न आणि मागण्या महत्वाच्याच आहेत. परंतु, गोरगरीब सर्वसामान्यांची कामेसुद्धा महत्वाची आहेत. परंतु एकदिवसीय कामबंद आणि बेमुदत कामबंद यामुळे अनेकांचे उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र व इतर दाखले, जे की शैक्षणिक कामासाठी आवश्यक आहेत, ते अडकून पडली आहेत. त्यामुळे महसूल कर्मचारी बांधवांनी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस न धरता, त्यांचे प्रश्न शासन दरबारी लावून धरावेत, पण सर्वसामान्यांचे प्रलंबीत दाखले द्यावेत. शासनानेसुद्धा कर्मचार्‍यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी व तोडगा काढावा. तसेच, कर्मचारी कामबंद करत असतील तर त्यांची कामे स्वतः अधिकारीवर्गाने हाती घ्यावीत, अशी मागणीही विनायक सरनाईक यांनी केली आहेत.

वैद्यकीय व अर्जंटचे दाखले तातडीने देणार; चिखली महसूल प्रशासनाची ग्वाही!

 

‘भूमिअभिलेख’चे पोर्टलही बंद; तलाठीही संपावर जाणार; शेतकरी वार्‍यावर सोडणार का?

एकीकडे तलाठ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असताना, व कामबंदची हाक दिली असताना दुसरीकडे, १९ जुलै ते २२ जुलैदरम्यान भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाईन पोर्टलही तांत्रिकदृष्ट्या बंद राहणार आहे. त्यामुळे भूमिअभिलेखचे विविध दाखले मिळणेही चार दिवस बंद राहणार असल्याने नागरिक, शेतकरी यांचे अतोनात हाल होणार आहेत. सातबारा उतारे, आठ-अ, मिळकत दाखले, फेरफार उतारे आदी मिळणे बंद राहणार असल्याने शेतकर्‍यांची महत्वाची कामे ऐन खरिपाच्या हंगामात अडकून पडली आहेत. त्याचादेखील शेतकर्‍यांना मोठा फटका बसणार आहे. सद्या ई-पीक पाहणी, खरिप पीकविमा योजना, तसेच अन्य योजनांसाठी शेतकरी अर्ज करत आहेत. तलाठ्यांचा संप व भूमिअभिलेखचे पोर्टल बंद राहणार असल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यासाठी महसूल अधिकारीवर्गाने तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणीही विनायक सरनाईक यांनी केलेली आहे.

महसूल कर्मचार्‍यांचा संप मिटविण्याच्या शासन पातळीवर जोरदार हालचाली; २३ तारखेला बोलावली बैठक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!