BULDHANAHead linesVidharbha

अखेर ज्वारी खरेदीचे ‘पणन’चे पोर्टल सुरू; आजपर्यंत ६३ हजार क्विंटलची ज्वारी खरेदी!

– ऐनवेळी कंपनी बदलल्याने १८ दिवस लटकले होते ज्वारी खरेदीचे ऑनलाईन काम!
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वेळोवेळी सडेतोड वृत्त प्रकाशित करून वेधले लक्ष

बुलढाणा (बाळू वानखेडे) – ऐनवेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून धान्य व भरड धान्य खरेदीसाठीची ऑनलाईन कामे करण्यासाठी नेमलेली कंपनी बदलल्याने जुन्या कंपनीचे पोर्टल बंद पडले होते. त्यामुळे तब्बल १८ दिवस राज्यासह जिल्ह्यातील पणनची ज्वारी खरेदीचे ऑनलाईन काम ठप्प पडले होते. आता नवीन करार केलेल्या कंपनीचे पोर्टल १५ जुलैपासून सुरू झाले आहे. त्यामुळे त्या १८ दिवसादरम्यान मेसेज गेलेल्या शेतकर्‍यांची खरेदी केलेल्या २२ हजार क्विंटल ज्वारीचे ऑनलाईन काम चार दिवसात पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ६३ हजार क्विंटल ज्वारी खरेदी झाल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी दिली. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वेळोवेळी सडेतोड व स्वयंस्पष्ट बातमी प्रकाशित करून पाठपुरावा करत, संबंधितांचे लक्ष वेधले होते.
Advt.

बाजारभावापेक्षा हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत जादा भाव मिळत असल्याने सहाजिकच पणन विभागाकडे ज्वारी खरेदीसाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली. सुरुवातीला ३३ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिल्या गेले. सदर उद्दिष्ट संपल्यानंतर राज्याचा अन्न व नागरी पुरवठा विभागाने अतिरिक्त उद्दिष्ट देण्याची मागणी संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे केली होती. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे उद्दिष्ट वाढीबाबत मागणीवजा शिफारस केली होती. यानंतर राज्याला अतिरिक्त वाढीव उद्दिष्ट देण्यात आले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला १ लाख ७० हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे अतिरिक्त उद्दिष्ट देण्यात आले असून, ३१ जुलैपर्यंत खरेदीची मुदतही वाढवून देण्यात आली.

दिनांक २७ जूनपासून पोर्टल बंद होते. सदर पोर्टल आता नियमित सुरू झाले असून, एसएमएस आलेल्या शेतकर्‍यांनी संबंधित खरेदी केंद्रावर आपला शेतमाल घेऊन यावा, काही अडचण असल्यास एम.जी. काकडे डीएमओ मो.न.९४२१४९३७६१, क़ंपनी प्रतिनिधी बाबाराव सूर्यवंशी मो.नं ८००८९०८९७८ यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा पणन विभागाने कळविले आहे.

या दरम्यान राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अधिनस्त मंत्रालयाने सन २०२३-२०२४ साठी धान्य व भरड धान्य खरेदीसाठीचे ऑनलाईन काम करण्यासाठी नेमलेल्या एनईएमएल कंपनीचे काम अचानक काढून घेतल्याने सदर कंपनीचे पोर्टल बंद पडले. त्यामुळे २७ जूनपासून म्हणजे तब्बल १८ दिवस ज्वारी खरेदीचे ऑनलाईन काम ठप्प पडले होते. शेतकरी मात्र संबंधित खरेदी केंद्रावर चकरा मारून त्रस्त झाले होते. विशेष म्हणजे, ऑनलाईन कामात गोंधळ होऊन खरेदी थांबेल, याचा त्रास शेतकरी व कर्मचार्‍यांनाही होईल, अशी भीती व्यक्त करत निदान यावर्षीसाठीचे काम जुन्याच एनईएमएल कंपनीला राहू द्यावे, यासाठी विदर्भातील काही मंत्री, आमदारांनी सतत पाठपुरावा करूनही मंत्री छगन भुजबळ यांनी कोणालाही जुमानले नसल्याची माहिती हाती आली आहे. याबाबत जिल्ह्यातील काही आमदारांचे तर फोनही घेतले नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून धान्य व भरड धान्य खरेदीसाठी बीईएएम या नवीन कंपनीशी करार करण्यात आला असून, या कंपनीचे पोर्टल १५ जुलैपासून सुरू झाले आहे. त्यामुळे यादरम्यान एसएमएस गेलेल्या शेतकर्‍यांची खरेदी केलेल्या २२ हजार क्विंटल ज्वारी खरेदीची ऑनलाईन नोंद सदर पोर्टलवर घेण्यात आली आहे. जुन्या एनईएमएल कंपनीच्या पोर्टलवर ४० हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली असून, पैकी २९ हजार क्विंटलचे पेमेंट अदा करण्यात आले आहे. ११ हजार क्विंटल ज्वारीचे चुकारे लवकरच होतील. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ६३ हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे, असे डीएमओ एम.जी. काकडे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वेळोवेळी सडेतोड व स्वयंस्पष्ट बातमी प्रकाशित करून पाठपुरावा करत संबंधितांचे लक्ष वेधले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!