BULDHANAChikhaliHead linesVidharbha

कामगारांच्याप्रश्नी काँग्रेस आक्रमक; जिल्हा कामगार कार्यालयावर धडकला धडक मोर्चा!

– कामगार कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा!; कामगार कल्याणच्या अधिकार्‍यांना ३० जुलैपर्यंत ‘अल्टिमेटम’!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्यांचे लायसन्स रिन्यूअल होत नाही, त्यांना जे साहित्य मिळते, त्या साहित्याचे वाटप सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातून होत आहे. हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःच फोटो लावून त्यांच्या कार्यालयात त्याची वाटप करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन हे जिल्हा कामगार कार्यालय त्यांचे प्रश्न सोडवण्याचा काम करत आहे. भ्रष्टाचाराची दलदल झालेली आहे. या कामगार कार्यालयामध्ये कामगारांवर प्रचंड अन्याय होत आहे. येत्या ३० तारखेपर्यंत कामगारांचे जे प्रश्न आहे ते सोडवले गेले नाहीत तर प्रचंड असा मोर्चा घेऊन काँग्रेस पक्ष येणार, आणि या कामगार कार्यालय अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यालयात त्यांना कुलूप लावून बंद करू, प्रसंगी कामगारांसाठी कितीही केसेस आमच्यावर दाखल झाल्या तरी मागे हटणार नाही, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिला. काँग्रेसच्यावतीने कामगार कार्यालयावर करण्यात आलेल्या धडक आंदोलनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, दिलीपकुमार सानंदा, कामगार नेते सतिश शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वप्रथम जिल्हा काँग्रेस कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी अभिवादन करून तसेच कामगारांना पोवाडा सादर करून धडक आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलन जयस्तंभ चौक, संगम चौकमार्गे जिल्हा कामगार कार्यालयावर धडकले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला होता. तसेच हातात धरलेले विविध मागण्यांसाठीचे फलक, झेंडे लक्ष वेधत होते.जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून, जिल्ह्यातील कामगारांना गृह उपयोगी संच व इतर आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात येत असतांना काही मतदारसंघात साहित्य वाटप रखडल्याने वंचित राहण्याची पाळी येवून ठेपली आहे. एखादा अपघात घडल्यास नोंदणीअभावी कामगार मृत्युमुखी पडल्यास ग्रामसेवक, मुख्याधिकारी की कामगार अधिकारी यापैकी कोणास जबाबदार धरणार? नवीन बांधकाम कामगारांची तात्काळ नोंदणी करण्यात यावी, बांधकाम कामगारांच्या दैनंदिन जीवनात त्यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांसंदर्भात व मागण्यांसाठी तसेच जिल्ह्यातील बहुतांश बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी कामगार कल्याणकारी मंडळात केली असून त्यांना मंडळामार्फत शासनाच्या विविध योजना लागू करण्यात येतात. मात्र अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व भविष्यासाठी त्यांच्याकडे रोजमजुरीशिवाय पर्याय नाही, तसेच कामगारांच्या कुटुंबातील अनेक हुशार मुला-मुलींकडे अधुनिक साहित्यदेखील नाही. बांधकाम कामगारांच्या समस्या दिवसागणिक वाढतच आहेत. या कामगारांसाठी विमा संरक्षण देण्यात आले होते, मात्र सन २०१५ पासून नंतर यासाठी आवश्यक ती पूर्तता न झाल्याने नव्याने नोंदणी झालेले कामगार विमा संरक्षणापासून वंचित आहेत. कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांसाठी गृह उपयोगी संच उपलब्ध करून देण्यात आलेले असतांना केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी काही विधानसभा मतदारसंघातील कामगारांचे साहित्य संचवाटप रखडले आहे.
ग्रामसेवकांच्या प्रमाणपत्राअभावी ग्रामीण भागात नोंदणी रखडली आहे, ती तात्काळ करण्याची व्यवस्था करावी, ग्रामपातळीवर कामगारांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात यावे, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कामगारांची ससेहोलपट थांबवावी, या व इतर अनेक समस्यांनी बांधकाम कामगार बांधवांना ग्रासले आहे. या समस्यांच्या विळख्यातून कामगार बांधवांच्या सुटकेसाठी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा कामगार अधिकारी यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने कामगारांच्या विविध मागन्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.


चिखली तालुक्यात सक्रिय म्हणून १९ हजार कामगारांची नोंदणी झाली असून, जिल्हाभरात किट वाटप सूरू असताना जाणिवपूर्वक चिखली तालुक्याला वंचित ठेवण्यात आले आहे. ६ महिन्यांपासून १५ हजार किट तयार गोडावूनला पडून असून, जाणीवपूर्वक त्यांचे वाटप थांबविण्यात आले आहे. राहुल बोंद्रे यांनी पदाधिकार्‍यांसह, जिल्हा कामगार अधिकारी राठोड यांना त्यांच्या कार्यालयात प्रचंड आक्रमक होत घेराव घातला असता, तातडीने कामगारांना किट वाटप करण्यासंदर्भात प्रश्न विचारले असता, उद्यापासून लिस्ट लावल्या जातील आणि २००/३०० कामगारांना किट वाटप करणार असल्याचे राठोड त्यांनी सांगितले. तसेच आणि जर ते वाटप झाले नाहीतर काँग्रेस गोडावून ताब्यात घेउन आपण वाटप करणार असल्याचे काँग्रेस ने जाहीर केले.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!